गॅस सिलिंडर टाकी नव्या कम्पोजिट स्वरुपात
इंडियन ऑईल महाराष्ट्रात करणार आठशे कोटींची गुंतवणुक

पुणे १ ऑक्टोबर २०२१ – इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने (आयओसी) एलपीजी सिलिंडरसाठी खास इंडेन कंपोजिट सिलिंडर पुण्यात सादर केला आहे. सिलिंडरची नवी टाकी अर्धपारदर्शक आहे. त्यामुळे ग्राहकांना एलपीजी गॅसची पातळी तपासता येईल. तसेच ही टाकी हाताळण्यास अधिक सोपी असल्याची माहिती आयओसी महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक अनिर्बन घोष यांनी दिली.
सध्याच्या स्टील सिलिंडरच्या तुलनेत कंम्पोजिट सिलिंडर टाकी अधिक उपयुक्त आहे. रिकाम्या टाकीचे वजन स्टील टाकीच्या तुलनेत कमी असून, टाकी गंजरोधक आहे. पुण्यात सध्या ५ किलो आणि १० किलो वजनाचे सिलिंडर उपलब्ध आहेत. दहा किलोचे विना अनुदानित सिलिंडर घरगुती वापरासाठी असून, पाच किलो सिलिंडरची खुली विक्री होईल. गॅसची किंमत समान राहिल, मात्र सिलिंडरचे शुल्क ठेव म्हणून घेण्यात येईल.
महाराष्ट्रात करण्यात येणाऱ्या गुंतवणुकी विषयी माहिती देताना घोष म्हणाले, इंडियन ऑईल राज्यात ८०० कोटी रुपयांची गुंतवणुक करणार आहे. रीटेल आऊटलेट, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचा विस्तार करण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल. येत्या वर्षात १०० इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन आणि ३५ सीएनजी केंद्रांची उभारणी केली जाईल. या माध्यमातून ३,५०० रोजगार, सात लाख मनुष्य दिवसांचा अप्रत्यक्ष रोजगार आणि ४०० व्यावसायिकांना उद्योगाची संधी निर्माण होईल. मनमाड, अहमदनगर आणि सोलापूर टर्मिनलची क्षमता वृद्धी केली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्प उभारणीचे काम सुरु असून, तब्बल एक हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात आली आहे. बांधकाम कालावधीत तब्बल एक हजार कंत्राटी कामगारांना रोजगार उपलब्ध झाल्याचे घोष यांनी सांगितले.
कोविड साथीमुळे इंधनाच्या खपावर विपरीत परिणाम झाल्याची माहिती घोष यांनी दिली. साथ काळात राज्यात पेट्रोलचा खप ६७ आणि डिझेलचा खप ६६ टक्क्यांनी घटला आहे. कोविड पूर्व स्थितीशी तुलना केल्यास ऑगस्ट २०२१ पर्यंत पेट्रोलचा खप ८६ आणि डिझेलचा सरासरी खप ८२ टक्क्यांवर आला आहे. सध्या स्थिती सुधारत असून इंधनखप कोविडपूर्व खपाची पातळी गाठत आहे. दरमहा खपाची तुलना केल्यास ऑगस्ट २०२१ महिन्यातील पेट्रोल खप कोविडपूर्व ऑगस्ट महिन्यातील पातळीवर गेला असून, डिझेलचा खप ९० टक्क्यांपर्यंत आला आहे.औद्योगिक वापरासाठी एक्स्ट्रा तेज एलपीजी उत्पादन सादर करण्यात आले आहे. त्याच बरोबर एक्सपी १०० हे भारतातील पहिले १०० ऑक्टेन पेट्रोल, नवीन सर्व्हो ग्रीन माईल आणि रफ्तार हे वंगण (ल्युब्रिकंट्स) बीएस-६ वाहनांसाठी तयार केले आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल. तसेच इंजिनाची कार्यक्षमताही सुधारेल. अमृत महोत्सव रीटेल आऊटलेटद्वारे पेट्रोल, डिझेल, एक्सपी ९५ प्रीमियम पेट्रोल, इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन अशी सर्व उत्पादने एका छताखाली उपलब्ध होतील. तर, पाच किलो वजनाचा छोटा सिलिंडर इंधन वितरणाचे क्षितिज बदलून टाकेल.घोष म्हणाले, आता इंधन भरणे अधिक किफायतशीर होणार आहे. गुगल पे आणि इंडियन द्वारे इंधन खरेदी करणे ग्राहकांना अधिक फायदेशी ठरणार आहे. त्यासाठी इंडियन ऑईल आणि गुगल-पे यांनी सहकार्य करार केला आहे. त्यानुसार इंडियन ऑईलच्या देशभरातील पंपावर गुगल पे द्वारे इंधन भरल्यास ग्राहकांना ५०० रुपयांपर्यंतची रक्कम परतावा मिळू शकेल.
घोष म्हणाले, इंडियन ऑईलने राज्यासह देशभरातील ३० हजार रीटेल आऊटलेट स्वयंचलित केली आहेत. या माध्यमातून ग्राहकांना योग्य गुणवत्तेची, योग्य वजनाची खात्रीशीर उत्पादने मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्याच बरोबर बांधकाम, खाण आणि उद्योग क्षेत्रातील ग्राहकांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी इंधन पुरवठा करण्याची सुविधा कंपनीने सुरु केली आहे. त्यासाठी येत्या वर्ष अखेरीस शंभरहून अधिक मोबाईल डिस्पेंसर सुरु करण्याचे नियोजन आहे.इंडियन ऑईलने देशव्यापी सचोटी प्रकल्प हाती घेतला आहे. त्या अंतर्गत गुगल ऍपवर ग्राहकांना एक्स्ट्रा अवॉर्ड मिळविता येणार आहे. ग्राहक एक्स्ट्रा रिवॉर्ड योजनेला साईनअप करु शकतात. किंवा विद्यमान सदस्य गुगल पे खात्याशी सदस्यत्व जोडू शकता. इंडियन ऑईलने आयसीआयसीआय आणि आयडीएफसी या बँकांशी सहकार्य करार केला आहे. त्यामुळे ग्राहकांना कॅशलेस इंधन सेवेचा अनुभव घेता येणार आहे. त्यांचा प्रतिक्षा कालावधी देखील कमी होणार आहे. कोणत्याची मानवी हस्तक्षेपाशिवाय त्यांना इंधनाची किंमत अदा करता येणार आहे.
इंडियन ऑईलने घेतलेल्या कोविड लसीकरण मोहिमेविषयी बोलताना घोष म्हणाले, आत्ता पर्यंत राज्यातील २२ हजार कर्मचाऱ्यांचे (९९ टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यात डिलिव्हरी बॉय, ग्राहक संपर्क कर्मचारी, कंत्राटी कामगार, टीटी क्रू सदस्यांचा समावेश आहे. आणीबाणीच्या काळात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचा पुरवठा केला. त्याच बरोबर रिकामे कॉन्सेन्ट्रेटर मुंबईतील शिवडी आणि गोव्यातील वास्को येथे रिकामे ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली. इंडियन ऑईलने कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या समुहातील १३ कर्मचाऱ्यांना ६५ लाख रुपयांची मदत मानवतेच्या दृष्टीकोनातून केली आहे.
इंडियन ऑईलने अलीकडे दत्तक घेतलेल्या ब्रॅंड शुभंकर अथवा एक शिंगी गेंड्या बाबत (इंडियन ऱ्हायनो) माहिती देताना घोष म्हणाले, हा मॅस्कॉट अर्थात शुभंकर इंडियन ऑईलच्या खऱ्या भारतीयत्वाचे प्रतिनिधित्व करतो. एक शिंगी गेंडा ताकद, लवचिकता आणि भारतीयत्वाचे प्रतिक असल्याने तो एक पूर्ण शुंभकर म्हणून पुढे येतो. इंडियन ऑईलचा हा शुभंकर केवळ प्रचारासाठी नाही. पर्यावरणातील या रत्नाचे संवर्धन करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे यातून दर्शविण्यात आले असल्याचे घोष म्हणाले.