
पुणे : “महिला उद्योजिका, घरगुती व्यवसाय करणाऱ्या गृहिणी, बचत गटातील महिला अशा सगळ्यांचे जवळपास १८० स्टॉल पाहिले. या स्टॉलवर अतिशय दर्जेदार वस्तू आणि उद्योजिका होण्याचा या महिलांमधील दुर्दम्य विश्वास पाहायला मिळाला. कोरोनाच्या संकटकाळात सुरु झालेल्या ‘घे भरारी’ने छोट्या-छोट्या उद्योजिकांना सक्षम बनवण्याचे काम केले आहे,” असे मत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अशा महोत्सव, प्रदर्शनातून महिला उद्योजिकांना व्यासपीठ मिळत असून, त्यातून अनेकजणींना सक्षमपणे व्यवसाय विस्तारण्यास मदत होत असल्याचेही सोनाली कुलकर्णी यांनी नमूद केले.
महिला उद्योजिकांचे व्यासपीठ असलेल्या ‘घे भरारी’तर्फे २ ते ५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत आयोजित चार दिवसीय ‘घे भरारी’ प्रदर्शनाचे उद्घाटन सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्समध्ये येत्या रविवारपर्यंत (दि. ५) नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. यावेळी इमेज कन्सल्टंट मीनल ठिपसे, वरद प्रॉपर्टीजच्या अल्पना कुंटे, संयोजक नीलम उमराणी-एदलाबादकर व राहुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रभरातून चवदार खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडिमेड, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे, अत्तरे, परफ्युम, हॅण्डमेड दागिने, पेपर क्विलिंग, फ्रिज मॅग्नेट, अॅक्रॅलिक गिफ्ट आर्टिकल, फ्रीज बॅग, सुंगधी उदबत्त्या, लाईट वेट पर्स, चंदेरी कलमकारी साड्या, आकर्षक नक्षीकाम केलेल्या ओढण्या, वेगवेळ्या चवीची सरबते, नाचणी, तीळ, शेंगदाण्याचे लाडू, उपवास खाकरा, लहानांसाठी खेळणी असे वैविध्यपूर्ण स्टॉल येथे आहेत.
सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, “या प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलवर वैविध्यपूर्ण आणि युनिक उत्पादने आहेत. इतरत्र पहायला न मिळणाऱ्या अनेक नाविन्यपूर्ण व कलात्मक गोष्टी येथे आहेत. महिलांमधील कलागुणांना वाव मिळत आहे. समाजात या प्रकारचे उपक्रम राबवले जाणे गरजेचे आहे. साड्या, दागिने यासह विविध कलाकुसरीच्या व पर्यावरणपूरक वस्तू बनवत महिला स्वतःला व्यवसायिकतेकडे घेऊन जात आहेत.”
नीलम उमराणी-एदलाबादकर म्हणाल्या, “महिलांना, त्याच्यातील उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. जवळपास ८० टक्के महिलांचा सहभाग या प्रदर्शनात असून, इतर तरुण मुलांचे स्टार्टअप यात आहेत. प्रदर्शनातून महिला व्यावसायिकांना अनेक ग्राहकांना जोडता येते. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे १८० स्टॉल येथे आहेत. विविध वस्तू, खाद्यपदार्थ आणि मनोरंजन होईल.”मीनल ठिपसे व अल्पना कुंटे यांनीही प्रदर्शनाचे भरभरून कौतुक केले. तसेच या प्रदर्शनाला पुणेकरांनी मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन केले.