
पुणे: सिंहगड मुख्य रस्ता तसेच धायरी गावात जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजीपाला आणि फळ विक्रेते व्यवसाय करत आहेत. पालिकेच्या वतीने या व्यावसायिकांना हक्काची जागा मिळवून देण्यासाठी शिवसेना खडकवासला मतदारसंघाचे विभाग प्रमुख नीलेश गिरमे यांनी सहाय्यक आयुक्त संजीव ओहळ यांच्या कार्यालयात भाजी विक्री करून अनोखे आंदोलन केले.
भाजी विक्रीवर अनेकांचे संसार उभे आहेत. यातील अनेक फळ व भाजी विक्रेते आपली उपजीविका चालावी यासाठी हा व्यवसाय करतात. त्यातील अनेक जण हे परवानाधारक पथारी व्यवसायिक आहेत. मात्र, त्यांना व्यवसायासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यास पालिकेला अपयश आले होते. त्याबरोबरीने सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाकडून सातत्याने या विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात होते. सातत्याने कारवाई झाल्यामुळे या पथारी व्यावसायिकांना करोना उत्तर काळात मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला होता.
या आंदोलनात लोकप्रतिनिधी देखील उपस्थित झाल्याने तातडीने या विषयावर तोडगा निघावा यासाठी प्रयत्न करण्यात आला. सहाय्यक आयुक्त संजीव ओहळ व लोकप्रतिनिधी यांनी एकत्रितरित्या भाजी विक्रेते यांना धायरी फाटा पुलाखाली जागा देण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.यावेळी सहाय्यक आयुक्त संजीव ओहळ, अतिक्रमण विभागाचे धम्मानंद गायकवाड, अजिंक्य कचरे, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह अनेक भाजी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा त्यांना त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी, ही आमची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व उपायुक्त यांनी पूर्ण केल्याने हे आंदोलन यशस्वी झाले आहे. धायरी फाटा पुलाखाली १४० भाजी विक्रेत्यांना हक्काची जागा मिळाली आहे, असे शिवसेना खडकवासला मतदारसंघाचे विभागप्रमुख नीलेश गिरमे यांनी सांगितले.