समर स्विमींगतर्फे प्रशिक्षण वर्गाचे प्रमाणपत्र वितरण
संपूर्ण शरीराचा व्यायाम करणाऱ्या जलतरणावर भर हवा - मुरलीकांत पेठकर यांचे प्रतिपादन

पुणे : “जलतरण हा एक प्रकारचा व्यायाम तर आहेच; पण करिअरचे क्षेत्र देखील आहे. जलतरण खेळामुळेच मला पदक मिळू शकले. जलतरण केल्याने आपल्या संपूर्ण शरीरातील हालचाली नॉर्मल राहतात. त्यामुळे जलतरण करण्यावर आपण भर दिला पाहिजे,” असे प्रतिपादन ऑलम्पिक विजेते, जागतिक विक्रमवीर व पद्मश्री पुरस्कार प्राप्त जलतरणपटू मुरलीकांत पेठकर यांनी केले.
पिंपरी-चिंचवड आयुक्त शेखर सिंह व क्रीडा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडून जलतरण करण्याला प्रोत्साहन दिले जात आहे, ही आनंददायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.पिंपळे गुरव येथील काळुराम जगताप जलतरण तलाव येथे समर स्विमिंग कोचिंगच्या वतीने आयोजित प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात पेठकर अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. त्यांच्या हस्ते दीडशे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महापालिकेतील माजी जलतरण प्रशिक्षक पी. डी. पाटील, समर स्विमिंगच्या संचालिका विद्या कदम, संचालक समाधान कदम, क्रीडा शिक्षक रवींद्र कांबळे आदी उपस्थित होते.
मुरलीकांत पेठकर म्हणाले, “महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाने पुढाकार घेणे कौतुकास्पद आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे समर स्विमिंगसारख्या व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांना एक व्यासपीठ मिळाले आहे. त्यातून भविष्यातील अनेक चांगले जलतरणपटू, तसेच संकट काळात जीवरक्षक म्हणून मदतीला येणारी पिढी घडत आहे. आमदार अश्विनी जगताप व पिंपरी-चिंचवड क्रीडा विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने या भागातील एखादा जलतरणपटू ऑलम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला पदक जिंकून देईल, असा विश्वास वाटतो.”
विद्या कदम म्हणाल्या, “लक्ष्मण जगताप यांच्याप्रमाणेच अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक शशिकांत कदम व अमरनाथ कांबळे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी क्रीडा कौशल्यांसाठी प्राधान्य देत आहेत. पेठकर सरांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळाली. भविष्यात आपणही स्विमिंगमध्ये ऑलम्पिक विजेते होऊ शकतो, असा विश्वास मिळाला. क्रीडा आयुक्त मनोज लोणकर, क्रीडा अधिकारी शीतल मारणे, जयश्री साळवी, अनिता केदारी यांचे सहकार्य लाभले.”
यावेळी अनेक पालक व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समर स्विमिंगच्या प्रशिक्षणातून मुलांच्या व आमच्या मनातील पाण्याची भीती गेली असून, जलतरणाची कला अवगत झाली आहे. सहज व सोप्या पद्धतीने शिकवले जात असल्याने कमी वेळेत चांगले जलतरण शिकता आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन राधिका घोडके यांनी केले. रवींद्र कांबळे यांनी आभार मानले.