पुणेमनोरंजनमहाराष्ट्रविशेष

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण

आरोही देशपांडे, आर्या कुलकर्णी, पल्लवी परब, रेखा नावर प्रथम

पुणे: नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धा विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली असून विजेत्यांना प्रशस्तिपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. चार गटात झालेल्या या स्पर्धेत आरोही देशपांडे, आर्या कुलकर्णी, पल्लवी परब आणि रेखा नावर यांनी आपआपल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धेत जवळपास 100 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पारितोषिक वितरण अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष माधव राजगुरू, नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, दिपाली निरगुडकर, संध्या कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. नाट्यछटाकार दिवाकर यांचे पुतणे शशिकांत दिवाकर यांचीही विशेष उपस्थिती होती.

माधव राजगुरू म्हणाले, दिवाकर यांनी नाट्यछटा हा वाङ्मय प्रकार लिहून मराठी साहित्य विश्वाला देणगी दिली आहे. नाट्यछटा या प्रकारात थोडक्या मजकुरात जास्त आशय मांडता येतो. प्रकाश पारखी यांनी नाट्यछटा लेखन आणि नाट्यछटा सादरीकरणासाठी लेखक-कलाकारांना सतत संधी आणि प्रोत्साहन दिल्यामुळे नाट्यछटा प्रकार टिकून राहण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे नवनवे लेखकही लिहिण्यासाठी उद्युक्त होत आहेत. प्रकाश पारखी यांनी नाट्यछटा लेखन आणि सादरीकरणाचे वैशिष्ट्य सांगून नाट्यसंस्कार कला अकादमीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ज्येष्ठ रंगकर्मी सुमनताई शिरवटकर यांच्या सहकार्यातून या स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्पर्धेच्या परिक्षक संध्या कुलकर्णी म्हणाल्या, नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे नाट्यछटा लेखन कार्यशाळा घेतल्यामुळे यंदाच्या वर्षी लेखन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी कल्पकतेने आणि आशयपूर्ण लेखन केले असल्याचे संहितांवरून दिसून आले.शशिकांत दिवाकर यांनी नाट्यछटाकार दिवाकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाची सुरुवात पूजा पारखी हिने सरस्वती वंदना सादर करून केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालकलाकार श्रेया देशपांडे हिने केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रसन्न पाध्ये यांनी करून दिला तर आभार दिपाली निरगुडकर यांनी मानले.

स्पर्धेचा सविस्तर निकालगट क्रमांक 1 : प्रथम आरोही देशपांडे, द्वितीय अर्घ्य तळवलकर, तृतीय काव्या गोडबोले, चतुर्थ कृत्तिका जोशी.गट क्रमांक 2 : प्रथम आर्या कुलकर्णी, द्वितीय विक्रम तेलियार, तृतीय सुखदा इनामदार, चतुर्थ समीक्षा नानेकर.

गट क्रमांक 3 : प्रथम पल्लवी परब, द्वितीय अतुल दिवाकर, तृतीय स्वाती भाटिया, चतुर्थ मेधा भांडारकर, पाचवा आम्रपाली देशपांडे, सहावा क्रमांक गीतांजली तपस्वी. उत्तेजनार्थ जान्हवी जोशी, नम्रता पोंक्षे, राधिका देशपांडे, शिल्पा कुलकर्णी, तृप्ती सकुंडे, दिपा शिंगारे.

गट क्रमांक 4 : प्रथम रेखा नावर, द्वितीय संजीवनी फडके, तृतीय पुष्पा कुलकर्णी, चतुर्थ अशोक अडावदकर, पाचवा क्रमांक उषा चोरघडे.फोटो ओळ : नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांबरोबर माधव राजगुरू, प्रकाश पारखी, संध्या कुलकर्णी आणि दिपाली निरगुडकर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!