पुणे : मारवाडी समाजात खेळाचे महत्व रुजावे, आपापसांत चांगले नातेसंबंध बनावेत, व्यवसायाची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने आयोजित पहिल्या ‘मारवाड कप’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ‘एचएफएआयपीएल’चे कांतीलाल ओसवाल, दिनैश ओसवाल व क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांच्या हस्ते झाले. महर्षीनगर येथील कटारिया हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या या सोहळ्यावेळी संयोजक अशोक हिंगड, आनंद बोराना, राणावत ग्रुपचे विशाल राणावत, चंदन मार्बल ग्रुपचे सुरेश नागोरी, प्रसिद्ध वकिल उज्वलजी निकम यांच्यासह नामवंत क्रिकेटर, सेलेब्रिटी, स्पॉन्सर्स व समाजातील प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होती.
महिलांच्या गटातील उद्घाटनाचा सामना शिवगंज लायन्स आणि सीलदार लिजेंड्स यांच्यामध्ये झाला. सीलदर लिजेंड्सने सहा षटकांत ७ गडी गमावत ३४ धावा केल्या. ३५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या शिवगंज लायन्सने हा सामना ५ गडी राखून जिंकला. राखी सोळंकी हिने सर्वाधिक १८ धावा केल्या. पुरुष गटातील उद्घाटनाचा सामना सादडी राणकपुर वॉरियर्स आणि किंग्ज इलेव्हन बाली या दोन संघात झाला. विशाल कोठारी याच्या १२ चेंडूतील २० धावांच्या योगदानामुळे किंग इलेव्हन बाली संघाने आठ षटकांत ५९ धावा केल्या. सादडी राणकपुर वॉरियर्स संघाने ६० धावांचे लक्ष्य केवळ ३.५ षटकांतच गाठले. ऋषभ बांबोळी याने धडाकेबाज अर्धशतकी (५०) खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
अशोक सिंगड म्हणाले, “राजस्थानातील अनेक छोट्या-छोट्या गावातून मारवाडी लोक देशाच्या विविध भागात विखुरले आहेत. या गावांची संस्कृती जतन व्हावी, लोकांमध्ये स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर राहणारी अनेक मुले आपल्या गावी कधीच गेली नाहीत. त्यांना आपल्या गावाविषयी आत्मीयता वाढावी, यासाठी राजस्थानातील विविध गावांची नावे स्पर्धेत सहभागी संघाना दिली आहेत. देशाच्या कोणत्याही भागात राहणारे मारवाडी लोक आपापल्या गावाच्या संघात सहभागी झाले आहेत. यातून मुलामुलींची ओळख होईल. व्यवसाय, संस्कृतीची देवाणघेवाण होण्यास प्रोत्साहन मिळेल.”
गौरव सोळंकी म्हणाले, “टेनिस बॉलवर होत असलेल्या या स्पर्धेत पुरुषांचे १६ व महिलांचे ८ असे संघ सहभागी झाले आहेत. समाजातील तरुणांना, महिलांना आपल्यातील कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहेत. आयपीएलच्या धर्तीवर विजेत्या, उपविजेत्या संघाला, तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, सामनावीर, मालिकावीर अशी विविध पारितोषिके देण्यात येणार आहेत. बाईक, सायकल, गोवा टूर अशा स्वरूपाची ही पारितोषिके आहेत. १२ तारखेला अंतिम सामने होणार आहेत.”
महिलांना खुलेपणाने खेळण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. घरातून बाहेर पडून महिला आपल्यातील खेळाचे कौशल्य दाखवू शकतील. त्यासोबतच समाजातील महिलांची एकमेकींशी ओळख होण्यास ही स्पर्धा उपयुक्त ठरेल, असे रूपल बाफना व साक्षी पुनामिया यांनी नमूद केले.