गुन्हेगारीपुणेमहाराष्ट्रविशेष

मानाच्या गणपतींच्या आधी विसर्जन मिरवणूक काढण्याची याचिका फेटाळल्याबद्दल मा. उच्च न्यायालयाचे आभार

पुणे : लक्ष्मी रस्त्याने मानाच्या गणपतींच्या आधी विसर्जन मिरवणूक काढण्याची परवानगी याचिका नुकतीच मा. उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामाध्यमातून भारतीय संस्कृतीची परंपरा जपली असून हा जय पराजय नाही, तर सक्षम व्यवस्थेवर विश्वास आहे, हे सिद्ध झाले आहे. पुणेकरांच्या श्रद्धेचा हा विजय असून याबद्दल उच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार मानत असल्याची भावना मानाच्या पाच गणपती मंडळे आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टच्या अध्यक्ष व पदाधिका-यांनी व्यक्त केली.

पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेला श्री कसबा गणपती मंडळाचे ॠग्वेद निरगुडकर, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, श्री गुरुजी तालीम मंडळाचे प्रविण परदेशी, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, श्री केसरी वाडा गणपती मंडळाचे अनिल सकपाळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आदी उपस्थित होते.

मानाच्या गणपतींची मिरवणूक २४ तास चालते, या आरोपात काही तथ्य नाही. मानाचे गणपती इतर मंडळांना तुच्छतेची वागणूक देतात, पोलीसांवर दबाव आणतात या गोष्टींना कुठलाही आधार नाही. ऐन गणेशोत्सवात न्यायालयात खेटे मारणे हे कार्यकर्ता म्हणून अत्यंत दुर्दैवी आहे. विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध, दिमाखदार पण वेळेत काढण्याचा आम्ही देखील प्रयत्न करणार असल्याचे मंडळाच्या पदाधिका-यांनी सांगितले.

यंदाच्या वर्षी मिरवणुकीला उशीर होण्यास अनेक कारणे आहेत. दोन वर्षाच्या कोविड महामारी नंतर उत्सव साजरा होत असल्याने भाविकांच्या भावना उर्त्स्फूत होत्या व मिरवणूक मार्गावर भाविकांची गर्दी खूप असल्याने मिरवणुकीचा वेग मंदावला. परंतु दुस-याला दोष देण्यापेक्षा आम्ही आत्मपरीक्षण करणार आहोत. आमच्याकडून ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत, त्या त्या गोष्टी आम्ही करुन मिरवणूक लवकर संपविण्याचा प्रयत्न करणार आहोत. पोलीस प्रशासनाची जबाबदारी असली तरी आम्ही त्याची नैतिक जबाबदारी स्विकारुन पुढील रुपरेषा ठरवणार आहोत.

पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीला एक परंपरा आहे आणि तिची अनेक वैशिष्टये आहेत. परंपरा अबाधित ठेवून परिवर्तनाची कास धरण्याचा प्रयत्न आम्ही करणार असून पुढील वर्षी गणेशोत्सव अधिकाधिक चांगला कसा होईल आणि मिरवणूक दिमाखदार, पण वेळेत कशी होईल याचा प्रयत्न करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष व पदाधिका-यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!