माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळतर्फे राज्यव्यापी रक्तदान मोहीम
५ हजार रक्त बाटल्या संकलित करण्याचे उद्दिष्ट
पुणे : माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ आणि माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ च्या माजी विद्यार्थ्यांनी राज्यव्यापी रक्तदान मोहीम हाती घेण्यात आली आहे. रविवार दिनांक २० ऑगस्ट रोजी माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ आणि माजी विद्यार्थी तसेच इतर ३० सामाजिक संस्था एकत्रितपणे राज्यव्यापी रक्तदान सोहळे आयोजित करणार आहेत. या रक्तदान मोहिमेतून सुमारे ५ हजार रक्तदात्यांना प्रोत्साहित करून ५ हजार रक्त बाटल्या संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या उपक्रमास समान ध्येय असणाऱ्या इतर सामाजिक संस्थांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. माजी विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला आहे. जीव वाचवा या ध्येयाने प्रेरित होऊन त्या चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबविली गेली.ही मोहीम केवळ रक्त संकलन करण्यापूर्ती मर्यादित नाही, तर प्रत्येकाने समाजाची परतफेड करण्याची भावना जागृत करणे, हे सुद्धा उद्दिष्ट आहे.
या मोहिमेद्वारे सुमारे ५ हजार जीवनांना स्पर्श केला जाईल व एक सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होईल.पुण्यातील लाहोटी वसतिगृह मॉडेल कॉलनी, लक्ष्मी वसतीगृह मुकुंद नगर, बाणेर वसतीगृह, महेश विद्यालय कोथरूड, खंडेराय मंगल कार्यालय आकुर्डी, कस्तुरी थाळी वाघोली आदी ठिकाणी रक्तदान महायज्ञ राबविण्यात येत आहे.