पुणे : “समाजामध्ये महिलांच्या सन्मानासाठी विशिष्ट महिला दिन साजरा करावा लागतो. यावरूनच आजही महिला आणि पुरुषांमध्ये अपेक्षित समानता आलेली नाही, हे दिसते. एक दिवस महिलांचा सन्मान केला जातो आणि वर्षभर त्यांना राबवले जाते, ही परिस्थिती बदलण्यासाठी पुरुषांच्या मानसिकतेमध्ये बदल होणे गरजेचे आहे,” असे मत राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज आणि नगरकर युथ फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थी सहायक समितीच्या मोडक सभागृहात झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सराफ व्यावसायिक फत्तेचंद रांका, विद्यार्थी सहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, नगरकर युथ फाउंडेशनचे प्रसाद नगरकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष विनीत अग्रवाल, संयोजक जीवराज चोले आदी उपस्थित होते.
विद्यार्थी सहाय्यक समिती (संस्थात्मक सामाजिक कार्य), मीना कुर्लेकर (सामाजिक), डॉ. ईउंजू लिम (शिक्षण), ॲड. अर्चिता जोशी (विधी आणि न्याय), डॉ. समिता मुलानी-कटारा (आरोग्य), शर्वरी गावंडे (राजकारण), वृषाली मोरे (क्रीडा), अमृता देशपांडे (साहित्य), राधिका अत्रे (सांस्कृतिक), अश्विनी जाधव-केदारी (पत्रकारिता), मेघना सपकाळ (विशेष सन्मान) यांना ‘नारीशक्ती सन्मान’ प्रदान करण्यात आले.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “महिला घर सांभाळबरोबरच उंबऱ्याच्या बाहेर पडून समाजातही आपले कर्तृत्व गाजवण्यासाठी सक्षम आहेत. मात्र, त्यांना नोकरी करण्यासाठी पुरुषांची परवानगी घ्यावी लागते ही मानसिकता योग्य नाही. संसाराच्या नावाखाली महिलांचे कर्तृत्व दुर्लक्षित केले जाते. त्यांना मुक्तपणे करिअरच्या वाटा खुल्या करायला हव्यात.”
फत्तेचंद रांका म्हणाले, “आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. पुढची पिढी संस्कारक्षम आणि सुदृढ घडवायची असेल, तर महिला शिक्षित व सक्षम व्हायला हवी. त्यांच्यातील उपजत गुणांचा शिक्षण, नोकरी आणि व्यवसायामध्ये सदुपयोग केला, तर त्या व्यवसायाला नवीन उंची मिळवून देतात.”
डॉ. ईउंजू लिम, अमृता देशपांडे यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले. विनीत अग्रवाल यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. प्रसाद नगरकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर जाधवर यांनी सूत्रसंचालन केले. जीवराज चोले यांनी सन्मानार्थींचा कार्यपरिचय दिला. संध्या अगरवाल यांनी आभार मानले.