पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

खडकीकडे जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून आता दुहेरी वाहतूक

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रयत्नांना यश : पुणे शहर वाहतूक शाखेने काढले आदेश

पुणे : जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील खडकीकडे जाणारा रस्ता असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आता दुहेरी वाहतूक सुरू होणार आहे. मागील तीन वर्षापासून सुरू असलेले मेट्रोचे काम तसेच रस्ता रुंदीकरणामुळे हा मार्ग एकेरी करावा लागला होता. यामुळे खडकी मुख्य बाजार येथे अडचण निर्माण होत होती. ती अडचण आता आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रयत्नातून दूर झाली आहे.

पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. मधल्या काळामध्ये नागरिकांशी बोलून, स्थानिक वाहतूक पोलीस यांना विश्वासात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग दुचाकी आणि तीनचाकी यांच्यासाठी शिरोळे यांनी दुहेरी करून घेतला होता. तरीही खडकीच्या मुख्य बाजार परिसरात खूप मोठी अडचण सर्वच नागरिकांना आणि तेथील व्यापाऱ्यांना सहन करावी लागत होती.

मात्र, आता चर्च चौक ते बोपोडी चौक आणि बोपोडी चौक ते खडकी बाजार मार्ग हा होळकर पुलापर्यंत एल्फिस्टन रस्त्यावर आता दुहेरी वाहतूक सुरु होणार आहे. तसेच, चर्च चौक ते आयुध चौक दरम्यान जनरल थोरात मार्गावर दुहेरी वाहतूक सुरु करण्यात येत आहे.

आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, जुन्या पुणे मुंबई महामार्गाच्या रस्ता रुंदीकरण कामाची गती देखील वाढविण्यास प्रयत्न केले जात आहेत. आता वरील मार्ग वाहतुकीस दुहेरी खुले झाल्याने खडकी बाजारातली व्यापारी, नागरिक यांना दररोजच्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे.ते पुढे म्हणाले, मेट्रोचे काम सुद्धा पूर्ण झाले आहे आणि आता लवकरच जय हिंद टॉकीजविषयी न्यायालयाने मार्ग सुकर केल्याने रस्ता लवकरच पूर्ण होईल.

स्थानिक नागरिक पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून विकास कामांना यश मिळत आहे. मागील ५ वर्षात खडकी भागात ५ कोटी रुपये आणि बोपोडी भागात ६ कोटी रुपये विकासकामांसाठी मंजूर करून घेतले असून त्यानुसार अनेक कामे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!