पुणे : नुकत्याच झालेल्या पॅरा अॅथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले आहे. गतवर्षी देखील मी सुवर्ण कामगिरी केली होती. त्यामुळे पॅरिस येथे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आवश्यक असणारा ‘कोटा’ देखील पूर्ण करण्यात मला यश मिळाले आहे. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीला देखील सुरुवात केली आहे आहे. त्यामुळे पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत देखील भारतासाठी सुवर्णपदक मिळवायचेच आहे, असा निर्धार भारताचा पॅरा अॅथलेटिक खेळाडू सचिन खिलारी याने पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सोसायटीचे सचिव इरफान शेख, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक तथा मार्गदर्शक डॉ. गुलजार शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
१७ मे ते २५ मे दरम्यान जपानच्या कॅबे, जापानमध्ये सुरु असलेल्या पॅरा अॅथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील गोळाफेक प्रकारात आझम स्पोर्ट्स अकादमीच्या सचिन सर्जेराव खिलारी यांची निवड करण्यात आली होती. सचिनने या वर्षी देखील एफ-४६ या विभागात दमदार कामगिरी बजावताना १६.३० मीटरची गोळाफेक करताना सुवर्णपदक कमावले. गतवर्षी पॅरीस येथे झालेल्या स्पर्धेत सचिनने एफ-४६ या विभागात सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यामुळे या स्पर्धेत सलग दोन वर्ष सुवर्णपदक मिळविणारा भारतीय खेळाडू बनला.
मूळ सांगलीच्या असणारा सचिन गेल्या ४ वर्षांपासून पुण्यातील आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर सराव करत आहे. सरावात सातत्य राखणाऱ्या सचिनने सुरुवातीपासून दमदार खेळाच्या जोरावर अनेक स्पर्धांमध्ये यश मिळविले. बंगळूर येथील झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सचिनने पहिल्यादा सुवर्णपदक पटकावले. त्यांनतर त्याने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना आशियाई स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्याने प्रथमच आशियाई पॅरा अॅथलेटिक स्पर्धेत खेळताना १६.०३ मीटर गोळाफेक करताना सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानंतर सुरु झालेला सचिनचा प्रवास पॅरा ऑलिम्पिक पर्यंत येवून ठेपला आहे.
याविषयी बोलताना सचिन खिलारी पुढे म्हणाला, वातावरणाशी जुळवून घेणे हेच सर्व खेळाडूंसाठी आव्हानात्मक होते. मी पुण्यामध्ये सराव करताना असलेले तापमान आणि प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी असणारे तापमान यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होती. वातावरणाशी जुळवून घेताना अनेक समस्या आल्या, परंतू त्या सर्वावर मात करताना, मिळालेले सुवर्णपदक निश्चित मनाला समाधान देणारे आहे.
गेल्या चार वर्षांपासून आझम स्पोर्ट्स अकादमी येथील मैदानावर मी सराव करत आहे. सरावासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच गोष्टी डॉ. पी. ए. इनामदार, आबेदा इनामदार आणि आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख यांनी उपलब्ध करून दिल्या. सरावामध्ये सातत्य राखण्यासाठी चांगले प्रोत्साहन मिळत गेले. यामुळेच आगामी स्पर्धांमध्ये देखील चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, असे सचिन खिलारी याने बोलताना सांगितले.
या विषयावर बोलताना महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार म्हणाल्या, मकॉए सोसायटीच्या वतीने आझम स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये असणाऱ्या गुणवत्तेला आम्ही कायम प्रोत्साहन देतो. अकादमीच्या माध्यमातून अनेक दमदार खेळाडू घडविण्याचा आम्ही कायमच प्रयत्न करत असतो. भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू किरण नवगिरे देखील आझम स्पोर्ट्स अकादमीची खेळाडू असल्याचा आम्हाला अभिमान आहे. सचिनने पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवावे, यासाठी आम्ही त्याला शुभेच्छा देतो.
यावेळी बोलताना मार्गदर्शक व आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख म्हणाले, आझम स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून खेळाडूंना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. सचिन सारख्या दमदार खेळाडूंना विनाव्यत्यय सराव करता यावा, यासाठी आधुनिक शेड असणारे मैदान तयार करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या गोष्टी खेळाडूंना आपला खेळ उंचावण्यासाठी सतत मदत करत असतात.
चौकट : परिस्थितीशी झगडताना स्वत:तील ‘खेळाडूला’ ठेवले जिवंत..!!
सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील करगणी हे सचिनचे मूळ गाव. शालेय वयापासूनच प्रचंड बुद्धिमत्ता असून देखील सचिनने ‘खेळाला’ निवडले. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर राज्य सेवा परीक्षेची तयारी सुरु केली. सन २०१५ साली सचिनने राज्य सेवा परीक्षेची मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली, मात्र त्यात त्याला अपयश आले. त्यानंतर त्याने याच परिक्षांसाठी आवश्यक असणारा भूगोल हा विषय शिकविण्यास सुरुवात केली. यामध्ये त्याने गुरुकुल अकादमी, गणेश कड अकादमी अशा ठिकाणी व्याख्याता म्हणून नोकरी देखील केली. हे सर्व सुरु असताना त्याने आपल्या खेळाचा सराव देखील एका बाजूला सुरुच ठेवला. साईचे प्रशिक्षक असणारे अरविंद चव्हाण यांच्याकडून तो खेळाचे धडे गिरवत आहे.