महाराष्ट्र कौशल्य मित्र राज्यस्तरीय संमेलन रविवारी (दि.१४)
सोशल रिस्पॉन्सिबीलिटी समूह संचलित आणि राष्ट्रीय कर्तव्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत विनामूल्य आयोजन
पुणे : सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह संचलित आणि राष्ट्रीय कर्तव्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत व अॅस्पायर नॉलेज अँड स्किल इंडिया लिमिटेड व सीएसआर हेल्प यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र कौशल्य मित्र राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. रविवार, दिनांक १४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयातील रसायन शास्त्र विभागात हे संमेलन होणार असून सहभागींना विनामूल्य प्रवेश आहे, अशी माहिती सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाचे अध्यक्ष विजय वरुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला अनिल वळसणकर, संजय गांधी, डॉ. दयानंद सोनसाळे, प्रसाद मिरासदार, धैर्यशील कुटे, सुनील बेनके आदी मान्यवर उपस्थित होते.
विजय वरुडकर म्हणाले, महाराष्ट्रातील तरुणांनी विविध क्षेत्रासाठी आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात करून आर्थिक उत्पन्नाच्या संधी आणि स्वयंरोजगार निर्माण करावेत, यासाठी कौशल्य मित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय कर्तव्य अभियान च्या सीएसआर हेल्पलाईन द्वारे या विषयात उद्योग समूहाचे सहकार्य मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
एनएसडीसी चे प्रतिनिधी अनिल वळसणकर म्हणाले, राज्यातील प्रत्येक तालुक्यात कौशल्य मित्र नियुक्ती करणे या बाबत सरकारने विशेष योजना आखणी केली आहे. संजय गांधी यांनी सांगितले की कौशल्य विकासातील स्वयंरोजगार निर्मितीविषयी पर्याय, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) यांचे अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण याविषयी माहिती कौशल्य मित्र पात्रता निकष आणि सशुल्क नोंदणी प्रक्रिया या विविध विषयांवर संमेलनात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या संमेलनासाठी २०० जणांची प्रवेश मर्यादा आहे.
डॉ. दयानंद सोनसाळे यांनी शासकीय व निमशासकिय अशा अनेक ठिकाणी कौशल्य विकास समन्वयक म्हणून काम करणा-या व्यक्ती व समूहाची गरज आहे. आम्ही त्या प्रत्येक समूहाला या विषयात सहभाग घेण्यासाठी संपर्क साधला आहे, असे सांगितले. धैर्यशील कुटे, सुनील बेनके, सारिका शेठ, अमित गांधी, पौर्णिमा इनामदार यांनी कौशल्य मित्र संमेलनाचे संयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी ७४४७४८७४८० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक समितीद्वारे करण्यात आले आहे.