पुणे : पर्वती विधानसभा मतदार संघ हा सर्व वर्गातील नागरिकांचा विभाग आहे. मात्र येथे गोरगरीब नागरिकांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आवश्यक असलेली रुग्णालये नाहीत. गेली पंधरा वर्षे येथे विकास थांबला आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षात पर्वती विधानसभा मतदारसंघात तीन अत्याधुनिक सुविधा असलेले व गोरगरिबांना परवडेल अशी रुग्णालये उभारण्यात येतील. असे आश्वासन शनिवारी अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी नागरिकांना दिले.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल हे गेली ३२ वर्षे महापालिकेत अपराजित नगरसेवक आहेत. त्यांचा जनसंपर्क हा दांडगा असून, याच प्रेमापोटी दररोज हजारो नागरिक त्यांची भेट घेऊन त्यांच्या विजयासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द देत आहेत. आज वाळवेकर लॉन्स येथे नागरिकांशी संवाद साधताना आबा बागुल यांनी पर्वती विधानसभा मतदार संघातील रुग्णालयांची कमतरता भरून काढण्यासाठी येत्या पाच वर्षात प्रयत्न करून, महापालिका व राज्य शासनाच्या माध्यमातून तीन अत्याधुनिक रुग्णालये उभारण्याची ग्वाही दिली. तसेच येथे विनामूल्य उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना आपत्तीच्या काळात गणेश कला क्रीडा मंच येथील हॉल मध्ये कोरोनाने बाधित रुगांची दिवसरात्र सेवा करून त्यांना आजारमुक्त करणाऱ्या आबा बागुल यांच्या कार्याचा आम्हाला अनुभव आहे. व आबा येत्या काही वर्षात पर्वती मध्ये नक्की ३ रुग्णालये, तेही अत्याधुनिक सुविधांसह तयार करून देतील असा विश्वास यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला. स्व. राजीव गांधी ई- लर्निंग सारखी देशातील पहिली शाळा महापालिकेच्या माध्यमाद्वारे सुरू करणारे आबा बागुल आमच्या भागात नक्कीच अत्याधुनिक रुग्णालये सुरू करतील अशी खात्री ही यावेळी अनेकांनी बोलून दाखवली.
दरम्यान आज आबा बागुल यांनी पर्वती मतदार संघात घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच मतदार संघातील महत्वाच्या व्यक्ती, पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी या सर्वांचीच कंबर कसून आम्ही तुमच्या विजयासाठी काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.