Pune: आजच्या व्यस्त जीवन शैलीमध्ये माणसाचं माणूसपणच हरवून बसलयं. कोणी अचानक आत्महत्या केली तर, आपण बोलतो. अरे बापरे! याने का असे टोकाचे पाऊल उचलले? त्याच्या मनाची घालमेल त्याने कोणालातरी सांगितली असती तर तो आज जिवंत असता. नंतर खुप का?, कसं काय?, किंतू, परंतू, कदाचित! वैगेरे वैगेरे असे शब्द प्रयोग आपण करतो.
आपल्यातून माणूस निघून गेल्यावर हे सर्व बोलायला अगदी सोपयं पण, त्याच्या मनाची अवस्था ऐकून घ्यायला आपल्याकडे वेळच नाही ना हो. “आत्महत्या” हा अतिशय गंभीर विषय आहे. जर कोणी नैराश्यामध्ये असेल आणि तुम्हाला म्हणाले, मला आत्महत्या करायची आहे किंवा असा विचार मनात येत आहे. त्यावेळी त्याला गांभीर्याने घ्या, समजावून सांगण्याचा प्रयत्न करा, मानसोपचार घेण्याचा सल्ला द्या. तुमची ही समयसुचकता कोणाचा तरी जिव वाचवू शकते. Depression free life
आपण आपल्याच कामात एवढं व्यस्त झालोय की, एखाद्या व्यक्तीला मानसिक आधाराची गरज असेल हा विचार किंचितही मनाला शिवत नाही. कोणाला कोणाचे प्रॉब्लेम्स ऐकून घेण्यात काहीही रस नसतो. त्यावेळी कसे लगेच तोंडातून निघून जाते “अरे निघ ना! डोक नको खाऊ, त्रास नको देऊ मला” “अरे कशाला किरकीर करतोय? मी रिकामा आहे का तुझं रडगाणं ऐकायला?” असं बरचं काही आपण रागात बोलून जातो. हेच कटू सत्य आहे.
त्यावेळी आपल्याला असं वाटत नाही की, त्याला विचारावं “सांग मनमोकळेपणाने काय आहे तुझ्या मनात?” या एका सहानुभूतीच्या वाक्याने त्याच्या मनातील असंख्य नकारात्मक वादळे शांत होतात. काही नाही तर माणूसकीच्या नात्याने का होईना हा प्रश्न विचारायलाच हवा. कारण, या प्रश्नामुळे त्या व्यक्तीस धीर मिळतो. कोणीतरी आहे माझ्या मनाची घालमेल ऐकून घेणारं. जर कोणी त्याचे दुःख, प्रॉब्लेम्स आपल्याला सांगत असेल तर दयाळूपणाने, माणुसकीच्या नात्याने ते ऐकावेत. त्याला काही सकारात्मक सल्ले द्यावेत.
व्यक्ती तेव्हाच दुसऱ्यांचा सल्ला घेतो. ज्यावेळी त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे सापडत नसतात. यासाठी गरजेचं नाही तुम्ही मानसोपचार तज्ञच असावे. तुम्ही एक चांगले श्रोते असाल तरी पुरेसे आहे. सांगणाऱ्याला कोणीतरी ऐकणारे आणि समजून घेणारे हवे असते. तुम्ही जर तुमच्या प्रियजनांसाठी ऐकणारे जरी झालात तरी खुप आहे.
तुमच्या याच छोट्याशा कृतीमुळे कोणीतरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय मागे घेऊ शकतो किंवा नैराश्यामध्ये जाण्यापासून वाचु शकतो. ते म्हणतात ना, एखाद्याचे दुःख दूर करता आले तर त्याहून मोठे पूण्य नाही. चला तर मग करताय ना ? आजपासून एक माणुसकीचा हात पुढे?
✒️- सुप्रिया साबळे (पत्रकार, मानसोपचार तज्ञ)