सिद्धार्थ शिरोळे यांचा सुज्ञ मतदारांवर विश्वास
विविध स्तरामधून शिरोळे यांना वाढता पाठींबा
पुणे : “शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व स्तरांतील, वयोगटातील नागरिकांसाठी आणि तरुण सहकाऱ्यांसाठी मी पाच वर्षांमध्ये काम करून दाखविले आहे. ही कामे जनतेसमोर असल्याने विरोधकांच्या भुलथापांना जनता फसणार नाही. शिवाजीनगरच्या सुज्ञ मतदारांवर माझा विश्वास आहे”, असे भारतीय जनता पार्टीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी स्पष्ट केले.
लोकांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि सरकारकडून आवश्यक निधी आणण्यासाठी केलेली खटपट यांतूनच जनहिताची अनेक कामे करू शकलो, असे आमदार शिरोळे यांनी स्पष्ट केले. शिवाजीनगर, औंध भागात काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान ते बोलत होते. यावेळी शिरोळे यांनी लहान थोर, महिला, युवा, व्यापारी, नोकरदार अशा सर्वच नागरिकांशी आपुलकीने संवाद साधलेला पहायला मिळाला.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, पुणे मेट्रो ही शिवाजीनगरमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वात उपयुक्त ठरली आहे. या मेट्रोची दहा स्थानके शिवाजीनगर मतदारसंघात आहेत. याच जोडीला आता शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोचे कामदेखील विक्रमी वेळेत पूर्ण होताना दिसत आहे. या मेट्रो मार्गामुळे शिवाजीनगर मतदारसंघातील नागरिकांना मेट्रोची आणखी तीस स्थानके उपलब्ध होणार आहेत. या दोन्ही मेट्रो मार्गांमुळे शिवाजीनगरमधील विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला आदी सर्व जण जलद आणि आरामदायी प्रवास करू शकणार आहेत. “पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असून, येत्या जानेवारीत ते पूर्ण होईल. या पुलामुळे वाहतूक कोंडी निश्चितपणे कमी होईल.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. सोबतच खडकी व रेंज हिल्स येथील अंडर ब्रिजच्या विस्तारीकरणाचा विकास आराखडा तयार केला जात आहे. यासाठी महापालिकेने निधी राखीव ठेवला आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या एकत्रीकरणाचे काम सुरू आहे. भूमिगत मेट्रोवर प्रशस्त एसटी स्थानक तयार होत आहे. केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानेच ही सर्व कामे मार्गी लागली आहेत, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालेले क्रांतिगुरू लहुजी वस्ताद स्मारक लवकरच पूर्णत्वास जाईल. तीन मजली होमी भाभा रुग्णालयही पूर्ण होत आल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. तसेच पूरग्रस्त वसाहतीमधील जवळपास बाराशे गाळ्यांना आणि जनवाडी, पांडवनगर येथेही ‘एफएसआय’ वाढवून देण्याची गरज आहे. यासंदर्भात राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जनतेच्या आशीर्वादाने २३ तारखेनंतर हे काम मार्गी लावून दाखवेन. महायुती सरकारमध्ये सर्वसामान्यांच्या कामाला निधी कमी पडत नाही, असे आमदार शिरोळे म्हणाले.