प्रेमोत्सवात महावतार बाबाजींच्या चरणी विश्व कल्याण प्रार्थना
धकाधकीच्या जीवनात गुरुनाम स्मरण गरजेचे- ज्येष्ठ विचारवंत व आयुर्वेदाचार्य डॉ. ज्योती मुंडर्गी
पुणे : महावतार बाबाजींचा क्रियायोग हा केवळ आध्यात्मिक आणि धार्मिक आधारावरच नव्हे तर वैज्ञानिक स्तरावरही सिद्ध झाला आहे. धकाधकीच्या आजच्या जीवनात अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी गुरुनाम स्मरण करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत आणि आयुर्वेदाचार्य ज्योती मुंडर्गी यांनी व्यक्त केले. पुण्यात १७ व्या महावतार बाबाजी प्रेमोत्सव सोहळ्यानिमित्त बाबाजींच्या चरणी विश्व कल्याण प्रार्थना व विविध कार्यक्रमांचे आयोजन कर्वे रस्त्याजवळील कोहिनूर मंगल कार्यालयात करण्यात आले होते. प्रेमोत्सवाचे उद्घाटन डॉ. ज्योती मुंडर्गी आणि आनंद प्रभू यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. तत्पूर्वी भावे गुरुजी आणि सहकाऱ्यांनी शांती मंत्र स्तवन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. विनया देव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
डॉ.ज्योती मुंडर्गी म्हणाल्या, आज माणूस केवळ भौतिक सुखासाठी जगत आहे. जगण्याचे साध्य आणि साधन काय आहे, याचे अनेकांना भान नाही. त्यामुळे अनेकदा जीवन भरकटलेले असते. हे भरकटलेले जीवन योग्य मार्गावर आणण्यासाठी महावतार बाबांचे नामस्मरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
त्या पुढे म्हणाल्या, महावतार बाबांनी सांगितलेले क्रियायोग हे केवळ अध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या नाही, तर वैज्ञानिक दृष्ट्याही सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याकडे आणि विचारांकडे तरुण साधकही वळत आहेत. सर्वांनी त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघून आपले जीवन अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.
आनंद म्हसवडे, मधुरा गोडबोले, शाहीर गुरुप्रसाद नानिवडेकर यांनी भजन गायन सेवा सादर केली. उदय ठकार आणि लक्ष्मी जयस्वाल यांनी त्यांना साथसंगत केले. महेश बर्वे यांनी ओंकार स्तवन केले.