पुणे : क्रेडाई-पुणे मेट्रोच्या २३ व्या वार्षिक प्रॉपर्टी प्रदर्शनाचे “पुणे प्रॉपर्टी एक्स्पो २०२५”, आज केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हे प्रदर्शन कृषी महाविद्यालय मैदान, पुणे येथे भरविण्यात आले असून, १९ जानेवारी २०२५ पर्यंत चालणार आहे. या प्रदर्शनाचे उद्दिष्ट घर खरेदीदार आणि गुंतवणूकदारांसाठी परवडणाऱ्या घरांपासून ते आलिशान गृहनिर्माण, एनए प्लॉट्सपासून प्रीमियम व्हिला, व्यावसायिक मालमत्ता ते प्री-लीज्ड प्रॉपर्टीपर्यंत विविध पर्याय उपलब्ध करून देणे आहे. प्रदर्शनात पुणे, पीसीएमसी आणि पीएमआरडीए क्षेत्रांतील ४०० पेक्षा जास्त RERA नोंदणीकृत प्रकल्पांसह ५५ हून अधिक विश्वसनीय विकासक सहभागी झाले आहेत.
उद्घाटनप्रसंगी केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री श्री मुरलीधरजी मोहोळ म्हणाले, “क्रेडाई-पुणे मेट्रो प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ चा भाग होणे हा माझ्यासाठी आनंदाचा विषय आहे. पुण्याच्या विकासासाठी होत असलेल्या प्रयत्नांवर चर्चा करण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वपूर्ण आहे. क्रेडाईच्या अध्यक्षांनी व्यक्त केलेल्या सूचना मला महत्त्वाच्या वाटतात. क्रेडाई-पुणे मेट्रोसारख्या संस्था पुण्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतात. पुण्यातील सध्या जवळपास ७० लाखाहून लोकसंख्या असून, ती पुढील काही वर्षांत आणखी वाढणार आहे. अभिमानी पुणेकर म्हणून, आपण सर्वांनी एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी योगदान देणे गरजेचे आहे.
वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासह सकारात्मक उपक्रमांना पाठिंबा देऊन पुण्याचे भवितव्य उज्ज्वल करू शकतो. सध्या आम्ही नवीन रस्ते बांधकाम, वाहतूक कोंडी कमी करणे आणि विमानतळ विकासाला प्राधान्य देत आहोत. दरवर्षी पुण्यात एक लाख नवीन घरे बांधली जात आहेत, ज्यामुळे पायाभूत सुविधांवर मोठा ताण पडतो. पाणी पुरवठा समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही १८०० किमी नवीन जलवाहिनी आणि जलमापक बसविण्याचे काम करीत आहोत.”
क्रेडाई-पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्री. रणजित नाईकनवरे म्हणाले, “क्रेडाई-पुणे मेट्रो सरकार आणि धोरणनिर्मात्यांसोबत सहकार्याने काम करण्याचा अभिमान बाळगते. केंद्रीय मंत्री श्री मुरलीधरजी मोहोळ यांच्यासोबत आम्ही शहर आणि नागरिकांसाठी पायाभूत सुविधांच्या विकासासंबंधी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली. यात पर्यावरण, जलदगती मेट्रो विस्तार, सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील कायदे सुधारणा आणि पुण्यात एक आंतरराष्ट्रीय दर्जेचे कॉन्व्हेंशन सेंटर बांधण्याच्या प्रस्तावांचा समावेश आहे.”
उद्घाटनप्रसंगी उपाध्यक्ष मनिष जैन, अरविंद जैन आणि कार्यकारी समिती सदस्य कपिल गांधी, पुनित ओसवाल, अनुप झमटानी उपस्थित होते.प्रदर्शनामध्ये प्रमुख आकर्षणांमध्ये विशेष ऑफर्स, नामांकित वित्तीय संस्थांकडून स्पॉट लोन सहाय्य आणि मनोरंजन उपक्रमांचा समावेश आहे. १९ जानेवारी रोजी, ग्राहक-केंद्रित चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये प्रसिद्ध तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.