पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेषशैक्षणिक

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित आठव्या युवा संसदेत ‘राजकारणातील व समाजकारणातील महिलांचा सहभाग’ यावरील सत्र

पुणे : महात्मा गांधी यांना आजच्या दिवशी ठार मारण्यात आले. परंतु महात्मा गांधी ही केवळ व्यक्ती नव्हती तर तो एक विचार होता. महात्मा गांधी यांना गोळ्या घालून त्यांचे विचार संपतील हा गैरसमज आहे. आजही महात्मा गांधींच्या विचारांविरोधातील लोक त्यांचे विचार मारण्याचा रोज प्रयत्न करत आहेत, ते लोक संपतील पण महात्मा गांधींचे विचार संपणार नाही. असे मत महाराष्ट्र राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आठव्या युवा संसद मध्ये ‘राजकारणातील व समाजकारणातील महिलांचा सहभाग’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये यशोमती ठाकूर बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, अहिल्या फाउंडेशनच्या अध्यक्ष रमाबाई लटपटे, इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य पूजा पारगे यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने गौरवण्यात आले. यशोमती ठाकूर म्हणाल्या, स्त्री पुरुष समानता ही आपल्या घरातून सुरू झाली तर त्याचा प्रचार समाजामध्ये होऊ शकतो. परंतु आज खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता अस्तित्वात आहे का ?असा प्रश्न पडला आहे. स्त्री पुरुष समानता केवळ कागदावर असून भागणार आहे तर ती प्रत्यक्षात अंमलबजावणी केली पाहिजे. त्यासाठी महिलांकडे पूर्वग्रह दृष्टीने न पाहता सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून त्यांच्या कार्याला नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे.

रूपाली चाकणकर म्हणाल्या, महिला आरक्षणामुळे समाजकारण आणि राजकारणातील महिलांचे प्रमाण वाढत आहे, परंतु ते प्रमाण पुरेसे नाही. महिलांच्या नावाने पुरुष सत्तेचा उपभोग घेत असेल तर या आरक्षणाचा उपयोग होणार नाही. त्यासाठी महिलांनी सबलीकरण केले पाहिजे आणि स्वतःचा कारभार स्वतः चालवण्यासाठी सक्षम असले पाहिजे. महिलांच्या पाठीशी पुरुष समर्थपणे उभे राहिले तर महिला सशक्तीकरणाच्या लढ्याला अधिक गती येऊ शकेल आणि तरच खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न साकार होऊ शकेल.

तृप्ती देसाई म्हणाल्या, महिला जेव्हा समाजकारण आणि राजकारणामध्ये काम करतात तेव्हा त्यांना प्रथम विरोध होतो त्यानंतर त्यांना धमक्या दिल्या जातात आणि त्यापुढे जाऊन त्यांचे चारित्र्य बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्व प्रकारांना सामोरे जाण्यासाठी महिलांनी मानसिकरित्या तयार असले पाहिजे. आजही महिलांना मंदिरामध्ये प्रवेश मिळण्यासाठी लढावे लागत आहे हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. महिलांनी स्वतःच्या मनातील भीती दूर करून स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी पुढे आले तरच खऱ्या अर्थाने त्यांचे अस्तित्व समाजाला दिसू शकेल.

पूजा पारगे म्हणाल्या ,महिलांना राजकारणामध्ये आरक्षणामुळे संधी मिळत असली तरी जर समाजासाठी खरंच चांगले काम केले असेल तर समाज आपली दखल घेतो आणि आपल्याला पुन्हा संधी देतो. राजकारण हे समाजकारण करण्याची एक संधी आहे ही बाब महिलांनी लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे चूल आणि मूल याच्या पलीकडे आपल्या अस्तित्व दाखवून देण्यासाठी महिलांनी राजकारणामध्ये सक्रियपणे सहभाग घेतला पाहिजे.

रमिला लटपटे म्हणाल्या, राजकारणाकडे केवळ पैसा आणि सत्ता मिळवण्याचे साधन म्हणून न पाहता राजकारणाकडे एक जबाबदारी म्हणून पाहिले तर निश्चितच बदल करू शकतो. नरेंद्र मोदी यांनी २०४७ सालापर्यंत सशक्त भारत निर्माण करण्याचे स्वप्न संपूर्ण भारताला दिलेले आहे त्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी प्रत्येकाने जर प्रामाणिकपणे स्वतःच्या क्षेत्रामध्ये काम केले तर निश्चितच हे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
19:20