पुणेमहाराष्ट्रविशेष

रविवारी होणार श्रीमंत नानासाहेब पेशवे जन्म त्रिशताब्दी भव्य सोहळा

श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे स्मारक समिती ; गौरव ग्रंथ प्रकाशन व ३०० युवकांचे समूहगान

पुणे : श्रीमंत बाजीराव पेशवे आणि काशीबाई यांचे सुपुत्र श्रीमंत नानासाहेब यांचा जन्म ६ डिसेंबर १७२१ रोजी वडगाव मावळ येथील साते गावी झाला. यंदाचे त्यांचे त्रिजन्मशताब्दी वर्ष असून त्यानिमित्त त्यांच्या जन्मगावी व पुण्यामध्ये देखील श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे स्मारक समितीतर्फे भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्य सोहळ्यांतर्गत नानासाहेब पेशवे गौरव ग्रंथाचे प्रकाशन होणार असून ३०० युवक समूह गायनाने आदरांजली अर्पण करणार आहेत. हा कार्यक्रम रविवार, दि. ५ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ४ वाजता जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील वडगाव मावळ जवळ साते या गावात होणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला सत्यशीलराजे दाभाडे, विक्रमसिंह मोहिते, रणजीत नातू, कुंदनकुमार साठे आदी उपस्थित होते.

मोहन शेटे म्हणाले, त्रिजन्मशताब्दी निमित्त आयोजित भव्य सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून प्रख्यात अभिनेते राहुल सोलापूरकर, प्रमुख पाहुणे म्हणून तंजावरचे ‘शिवाजी राजे भोसले आणि अध्यक्षस्थानी निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय सरदारांच्या वारसदारांचे सत्कार व प्रवेशद्वार कमानीचे भूमीपूजन देखील होणार आहे. श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे हे मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. इसवी सन १७४० ते १७६१ असे २१ वर्ष त्यांनी हिंदवी साम्राज्याचे पंतप्रधान म्हणून कार्य केले. त्यांच्याच काळात शिवनेरी, देवगिरी सारखे किल्ले स्वराज्यात आले. देशरक्षणासाठी पानिपतचा प्रखर संघर्ष झाला. अटकेवर भगवा झेंडा फडकवून मराठ्यांनी छत्रपती शिवरायांचे स्वप्न साकार केले.

पुण्यात शनिवारवाडा येथे दि. १ डिसेंबर रोजी मूर्ती, जलकलश पूजन बुधवार, दि. १ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता शनिवारवाड्यासमोर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या मूर्तीचे आणि रायगड, वढू, रावेरखेडी, थेऊर व वानवडी या महापुरुषांच्या समाधीस्थानावरील पवित्र जल आणलेल्या जलकलशांचे पूजन करण्यात येणार आहे. याप्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि पेशवे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. तसेच श्रीमंत नानासाहेबांनी सरदार अंताजी माणकेश्वर गंधे यांना भेट दिलेली तलवार यावेळी नागरिकांना पाहता येणार आहे.

पुणे येथून श्रीमंत नानासाहेबांची मूर्ती आणि तलवार व पवित्र जलकलश रथयात्रा मिरवणुकीने साते गावात नेण्यात येईल. या सोहळ्यास इतिहासप्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागत समिती अध्यक्ष सातारकर छत्रपती शिवाजीराजे भोसले, तसेच उपाध्यक्ष पुष्कर पेशवे, भूषणसिंह होळकर, लक्ष्मीकांत चासकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!