सातत्याने होत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर वारजे येथील कार्यालयावर जन आक्रोश आंदोलन
महामार्ग प्राधिकरणाकडून उपाययोजना न केल्यास मनुष्यवधचा गुन्हा दाखल करणार
पुणे: मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघात होत असून यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. परंतु या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आतापर्यंत कोणत्याच ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या बेजबाबदार प्राधिकरणाचा निषेध करण्यासाठी खडकवासला शिवसेनेचे विभाग प्रमुख निलेश गिरमे यांच्या नेतृत्वाखाली वतीने वारजे येथील कार्यालयावर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी प्राधिकरणाकडून तात्काळ उपाययोजना न केल्यास अधिकाऱ्यांना काळे फासून मनुष्यवधचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा निलेश गिरमे यांनी दिला आहे.
यावेळी विजय कणसे, नीलेश पोळ, वैभव थोपटे, लोकेश राठोड, आदित्य वाघमारे, शुभम देशभ्रतार, गौरव देशभ्रतार, सार्थक जाधव, आकाश चव्हाण आदी उपस्थित होते. मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी एका अपघातात तीन निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या महामार्गावर असलेल्या तीव्र उतारामुळे हा अपघात झाला. या उतारामुळे गेल्या काही वर्षात सातत्याने या महामार्गावर अपघात होत आहेत. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. अधिकारी फक्त आश्वासने देत आहेत, बैठक घेत आहेत, अहवाल मागवलं आहेत परंतु अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे या बेजबाबदार प्राधिकरणाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी प्रतीकात्मक तिरडी आणि पोतराज यांचा मोर्चा काढण्यात आला होता. नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतार आहे यामुळे वाहने वेगाने जात असतात परंतु या वाहनाच्या वेगांवर कोणतीच मर्यादा न ठेवल्यामुळे सातत्याने अपघतात वाढ होत आहे, त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहून त्यावर तातडीने उपयोजना करणे आवश्यक आहे.
नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतारावर वेग मर्यादा ८० वरून ४० प्रति तास करण्यात यावी, फलक लावण्यात यावेत. स्टड लाईट बसवावेत, विविध ठिकाणी रम्बल स्ट्रीप बसविणे, सोलर बिल्कर् देखील लावण्यात यावेत, कर्ब पेंटिंग करावे, वाहन चालकांना ड्रिंक अँड ड्राईव्ह, गो स्लोव, अपघात प्रवण क्षेत्र वाहने सावकाश चालावा अश्या सूचना देणारे फलक लावण्यात यावेत. तसेच महामार्गावर सातत्याने पडणारे खड्डे बुजवावेत अश्या मागण्या* निलेश गिरमे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकाकडे केल्या आहेत.