एमसीएविरुद्ध माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर करणार गुन्हा दाखल
ॲड. कमल सावंत, सदस्य आपेक्स काऊन्सिल यांनीही दिला पदाचा राजीनामा
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील (एमसीए) ९ वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झालेले सदस्य आणि ६ वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झाल्याने कुलींग ऑफमध्ये गेलेला एक सदस्य यांनी लोढा समितीच्या शिफारशीनुसार तत्काळ राजीनामे द्यायला हवेत. याचबरोबर एमसीएवर प्रशासक नेमण्याची गरज आहे, असे मत आमरण उपोषणाला बसलेले माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर यांनी व्यक्त केले. त्यांच्या उपोषणाचा आज आकरावा दिवस होय. आजच ॲडव्होकेट कमल सावंत, सदस्य आपेक्स काऊन्सिल यांनीही आपल्या पदाचा दिला राजीनामा देत वाल्हेकर यांना पाठिंबा दिला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना अनिल वाल्हेकर म्हणाले, मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील उन्मेश खानविलकर यांना माजी मुख्य न्यायाधिश व्ही. के. ताहीलरामानी यांनी कुलींग ऑफ पीरियडच्या नियमाखाली नुकतेच सेक्रेटरीपद सोडण्याचा आदेश दिला आहे. क्लब ऑफ महाराष्ट्र, पूना क्लब आणि जळगाव जिल्हा क्रिकेट संघटना यांनीही एमसीएच्या भ्रष्ट कारभाराविरुद्धच्या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे. अनिल वाल्हेकर यांना विविध संघटनेचा पाठिंबा मिळत असून, लवकर एमसीएविरुद्ध पोलीस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल होणार आहे. धर्मदाय आयुक्तालयातही एमसीएच्या विरुद्ध निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहितीही अनिल वाल्हेकर यांनी दिली.