पुणे: स्वच्छंदपणा मुक्ततेचे प्रतीक असलेल्या पतंगबाजीला मकर संक्रांतीच्या सणामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतामध्ये अनेक देशी खेळ खेळले जातात. त्यामध्ये पतंग बाजी हा एक रोमांचक खेळ मानला जातो. मकर संक्रांतीचा सण आरोग्यासाठी अनेक अर्थाने फायदेशीर आहे. या दिवसांमध्ये पतंग उडविल्यामुळे सूर्यप्रकाशातून आपल्याला व्हिटॅमिन डी चा चांगला स्रोत उपलब्ध होतो. तसेच हे त्वचेसाठी देखील चांगले मानले जाते आणि थंड वाऱ्यामुळे होणाऱ्या अनेक संक्रमण आणि रोगांशी लढण्यास मदत करते, असे प्रतिपादन धायरी गावच्या माजी सरपंच आशा बेनकर यांनी केले.
धायरी येथील शिवशंकर मित्र मंडळाच्या वतीने मकर संक्रांत दिनानिमित्त डीएसके विश्व् येथे धायरी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी महोत्सवात संदीप चव्हाण, सचिन पांगरे, सुमित बेनकर, तृप्ती पोकळे, दत्तानाना रायकर, आंतरराष्ट्रीय पतंगबाज रमेश पार्टे, महेंद्र भोसले, अक्षय बेनकर, कालिदास बेनकर आदी मान्यवर उपस्थित होते. धायरी पतंग महोत्सवात शालेय गट – ५ वर्ष ते १७ वर्ष या गटात कृष्णा मते (प्रथम) श्रीरंग चौधरी (व्दितीय), – श्रीराम मिसर (तृतीय), आणि खुला गट १८ वर्ष ते पुढे स्वप्निल कदम (प्रथम), राजेश डंक (व्दितीय), आदर्श ठोके (तृतीय) स्पर्धकांनी क्रमांक पटकवला. या सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
डीएसके विश्व् येथील मैदानावर पतंग उडविण्यासाठी धायरी परिसरातील बालचमू आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे येथील परिसर विविध रंगाच्या पतंगांनी फुलून गेले होते. या महोत्सवास परीक्षक म्हणून भारती विद्यापीठ स्कूलचे शिक्षक जगदीश कुंभार, आणि मुक्तांगण स्कूलचे बालाजी चौघुले यांनी काम पहिले.