‘कस्तुरी स्कुल ऑफ लॉ’तर्फे १४ ते १९ फेब्रुवारी दरम्यान मोफत कायदेविषयक सल्ला मार्गदर्शन सप्ताह
पुणे : कस्तुरी शिक्षण संस्था संचालित ‘स्कूल ऑफ लॉ’तर्फे संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १४ ते १९ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मोफत कायदेविषयक सल्ला मार्गदर्शन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक डॉ. पंडित पलांडे यांनी दिली. अधिकाधिक नागरिकांनी या सप्ताहात सहभागी होऊन आपल्या कायदेविषयक शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कौटुंबिक हिंसाचार, वैवाहिक मतभेद, घटस्फोटित महिलांच्या समस्या, महिलांचे हक्क व अधिकार, लहान मुलांच्या समस्या, लहान मुलांचे हक्क व अधिकार, एकेरी पालकत्व, वारसा हक्क विषयी वाद, मृत्युपत्र, पॉवर ऑफ अटर्नीय, कामगार व मालकांचे हक्क आणि कायदे, बौद्धिक संपदा हक्क व कायदा अशा विविध विषयांवर या सप्ताहात मार्गदर्शन केले जाणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा व प्राचार्य डॉ. जयश्री पलांडे यांनी सांगितले.
कायद्यासंदर्भात नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी व त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी मोफत कायदेविषयक सल्ला व सहाय्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात विविध प्रकारचे वाद मिटविण्यासाठी मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे, असे संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रतीक पलांडे यांनी नमूद केले. मोफत नावनोंदणीसाठी https://docs.google.com/forms/d/1A4N5yuc4tX5q0k-2iD2eLlPCXShRFXFOhpfj9wjxoE8/prefill यावर भेट द्यावी.
एनजीओ, पोलीस, महिलांचे अधिकार, विद्यार्थ्यांच्या समस्या, ग्राहक कायदा, कंपन्यांमधील कामगार, शेतीविषयक कायदे, मालमत्ता व जमीनविषयीचे वाद, भाडेकरूंच्या समस्या आदी विषयांवर मार्गदर्शन मिळणार असल्यामुळे नागरिकांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ९०२२०३४३८० या क्रमांकावर किंवा कस्तुरी शिक्षण संस्थेचे स्कुल ऑफ लॉ, शिक्रापूर, ता. शिरूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपप्राचार्य डॉ. सपना देव यांनी केले आहे.