कोल्हापूर कारागृहाला ज्ञानोबा-तुकोबा महाकरंडकयेरवडा-पुणे द्वितीय तर नाशिक संघाला तृतीय क्रमांक
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धाशरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कारागृह विभागातर्फे आयोजन
पुणे : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बंदीजनांसाठी घेण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेत कोल्हापूर कारागृहाने प्रथम क्रमांक पटकाविला. संघाला ज्ञानोबा-तुकोबा महाकरंडक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत येरवडा, पुणे कारागृहाचा संघ द्वितीय तर नाशिक कारागृहाचा संघ तृतीय आला. या संघांना अनुक्रमे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र, संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात देण्यात आले.स्पर्धेची महाअंतिम फेरी आज (दि. 13 जून) कारागृह कर्मचारी भवन, येरवडा कारागृह येथे घेण्यात आली. नाशिक, नागपूर, कोल्हापूर, तळोजा, पुणे आणि अमरावती या संघात अंतिम फेरी झाली.
पारितोषिक वितरण गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे (अपिल व सुरक्षा) यांच्या हस्ते झाले. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया यांच्यासह उद्योजक विठ्ठलशेठ मणियार, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, नंदकुमार बंड यांची प्रमुख उपस्थिती होती. तळोजा, अमरावती व नागपूर या संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
बंदिजनांसाठी कारागृहाच्या परिसरात डिजिटल लायब्ररी आणि उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी अशी अपेक्षा प्रास्ताविकात लक्ष्मीकांत खाबिया यांनी व्यक्त केली.शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेचे कौतुक करून दिनेश वाघमारे म्हणाले, जीवनात जोपर्यंत कला-क्रीडा यांचा समावेश होत नाही तोपर्यंत जीवनात रंग येत नाही. स्पर्धात्मक उपक्रम नियमित घेतले जावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
विठ्ठलशेठ मणियार म्हणाले, संत विचार आणि भजनांमध्ये किती ताकद आहे याचा अनुभव स्पर्धेच्या निमित्ताने घेता आला. अशा स्पर्धा सातत्याने घेतल्यास गुन्हेगारीमुक्त राज्य निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, असेही ते म्हणाले. बंदिजनांमधील कौशल्याचा विकास होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत अशी अपेक्षा अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली.बंदिनजांसाठी डिजिटल लायब्ररी सुरू करण्यासाठी दहा संगणक भेट देणारे धन्यकुमार दर्डा यांचा सत्कार दिनेश वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला. आभार डॉ. जालिंदर सुपेकर यांनी मानले.
महाअंतिम फेरीचा शुभारंभ जगद्गुरू संत तुकाराम महाराज देहू संस्थानचे प्रमुख पुरुषोत्तम महाराज मोरे आणि पालखी सोहळा प्रमुख-विश्वस्त अनिल महाराज मोरे तसेच अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता (महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र), शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष-स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उद्योजक राजेश सांकला, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून झाला. गुप्ता यांच्या हस्ते चिठ्ठी काढून स्पर्धेचा क्रम निश्चित करण्यात आला.
उपक्रमाचे कौतुक करून अभिताभ गुप्ता यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. पुरुषोत्तम महाराज मोरे म्हणाले, जीवनात स्पर्धा नसावी तर नजरेत नवी दिशा असावी क्षितीजापलिकडे जाण्याची जिद्द असावी. राजेश सांकला यांनी गणपती स्तोत्र सादर केले.हरिनामाचा गजर करून स्पर्धेला सुरुवात झाली. संतरचनांसह कैदी बांधवांनी रचलेल्या काही रचना सादर करून उपस्थितांना भक्तिरसाची अनुभूती दिली.
आयुष्यात नकळत काही चुका झाल्या त्यामुळे तुरुंगात जाण्याची वेळ आली; पण स्पर्धेमुळे जी संधी मिळाली आहे ती शब्दात वर्णन करता येण्यासारखी नाही. परमेश्वराचे नामस्मरण करीत ‘जरा विसावू या वळणावर’ अशी मनोभावना बंदिजनांनी स्पर्धेदरम्यान व्यक्त केली. स्पर्धेचे परीक्षण संगीततज्ज्ञ प्रमोद रानडे, डॉ. राजेंद्र दूरकर आणि युवा गायिका सावनी सावरकर यांनी केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विवेक थिटे, प्रा. ज्ञानदेव शिंदे, सोनल जगताप, अच्युत कुलकर्णी, रोशन खोब्रागडे, विरेंद्र लाटनकर, संदीप राक्षे, शेखर पाटील, किरण सानप, राकेश खराडे, पांडुरंग जगगेश्वर यांनी परिश्रम घेतले.