पुणेव्यवसायीकसामाजिक

कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशनच्या वतीने पालकमंत्र्यांचा सत्कार

कोथरुडकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची नामदार चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

Pune: कोथरुडमधील कर्वे रस्ता येथील व्यापाऱ्यांची पार्किंगची समस्या सोडविल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशन आणि पुणे व्यापारी फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला; आणि पार्किंगची समस्या सोडविल्याबद्दल आभार मानले. व्यापाऱ्यांच्या सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त करुन, आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही यावेळी नामदार पाटील यांनी दिली.

कोथरुड मधील कर्वे रस्त्यावरील वनाज ते गरवारे दरम्यान मेट्रो आणि नळस्टॉप चौकातील उड्डाणपुलाची कामे संपल्यामुळे कर्वे रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी करण्यास परवानगी द्यावी, अशी स्थानिक व्यावसायिकांची मागणी होती. या मागणीच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १९ जून रोजी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर आणि व्यापारी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली.

या बैठकीत कर्वे रस्त्यावरील संभाव्य वाहतूककोंडी टाळून, कॅरेज वेमध्ये स्थानिक व्यवसायिकांना वाहने पार्किंगसाठी परवानगी द्या. तसेच, स्थानिक व्यवसायिक आणि नागरिकांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होत नाही, तेथे वाहतूक पोलिसांनी पाहाणी करुन नो पार्किंगचे बोर्ड काढावेत, असे निर्देश दिले होते.पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार, ज्या ठिकाणी वाहनांकरीता जास्त कॅरेज-वे उपलब्ध आहे; अशा ठिकाणी नागरिकांच्या सोयीकरीता दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंग व्यवस्था करण्यात आली. तसेच जिथे वाहतूककोंडी होत नाही, अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांनी पाहाणी करुन नो पार्किंगचे बोर्ड काढून, व्यवसायिक आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा दिला होता.

पालकमंत्र्यांच्या कार्यतत्परतेप्रती सर्व व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, याबद्दल नामदार पाटील यांचा आज सत्कार करुन, आभार मानले. या सत्काराप्रती नामदार पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त करुन, कोथरुडमधील प्रत्येक नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही यावेळी दिली. दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगचे बोर्ड लावण्याबाबत अद्याप कार्यवाही झाली नसल्याची बाब व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर पालकमंत्र्यांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून, याबाबत विचारणा केली. त्यावर दोघांनीही आगामी आठ दिवसांत रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगचे बोर्ड लावण्याची कार्यवाही पूर्ण होईल, असे आश्वास्त केले.

तसेच, भाजपा सरकारने २०१६ मध्ये व्यापारी वर्गाच्या अडचणी लक्षात घेऊन; व्यापारी आस्थापनेच्या नावे दर्शविणारे नामफलक लावण्याची परवानगी दिली होती. मात्र, शासनाच्या सदर निर्णयाची पुणे शहरात योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याची बाब व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी नामदार पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. सदर निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना आयुक्त विक्रम कुमार यांना दिल्या. तसेच, व्यापाऱ्यांच्या अन्य समस्यांसाठी ही पाठपुरावा करु, असे आश्वास्त केले.

यावेळी कर्वे रस्ता व्यापारी आस्थापनेचे संस्थापक हस्तीमलजी चंगेडिया, उपाध्यक्ष बक्षरसिंग तलवार, अजित सांगळे, सचिव सुमतीलाल लोढा, संजीव गुजर, खजिनदार राजेश मेहता, शैलेश संत, हरिश पटेल, तेजस महाडिक, नंदू भेटवरा, क्षमा वाघ, पुणे व्यापारी फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका, ओमप्रकाश रांका, अजित धावडे, अजित सांगळे, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, मनसेचे हेमंत संभूस उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!