संपदा सहकारी बँकेचा सुवर्णमहोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा रविवारी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती
पुणे : संपदा सहकारी बँक लि. पुणे च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सुवर्ण महोत्सवी ‘संपदा’ शुभारंभ सोहळा रविवार, दिनांक ६ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अश्विनीकुमार उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला बँकेचे उपाध्यक्ष महेश लेले, मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश सरदेशपांडे, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष मुकुंद भालेराव आदी उपस्थित होते.
महेश लेले म्हणाले, या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून रा.स्व.संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे संघचालक सुरेश ऊर्फ नाना जाधव, अम्ब्रेला आॅर्गनायझेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवाडकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात सुवर्ण महोत्सवी वर्ष बोधचिन्ह अनावरणासह अर्थ साक्षरता अभियानांतर्गत पुस्तिकेचे प्रकाशनही होणार आहे.
गिरीश सरदेशपांडे म्हणाले, अर्थ साक्षरता अभियानांतर्गत बँकेच्या सर्व ८ शाखांच्या परिसरातील वस्त्यांमध्ये जावून तेथील नागरिकांना बँकिंग व्यवहार बद्दल विविध नियमांची माहिती, खात्यांचे विविध प्रकार, डिजिटल व्यवहारांमधील धोके, घ्यावयाची काळजी आदी माहिती देण्यात येणार आहे. आजपर्यंत याचे ८ कार्यक्रम देखील झाले आहेत. येत्या वर्षभरात जास्तीत जास्त कार्यक्रम करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
मुकुंद भालेराव म्हणाले, बँकेच्या ८ शाखांमध्ये मिळून १७०. १८ कोटींच्या ठेवी असून १०१.०८ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. बँकेचे निव्वळ एनपीए चे प्रमाण ०.०० % असून यावर्षी १.३२ कोटी इतका नफा झाला आहे. बँकेने नुकतेच सभासदांना ८ टक्के लाभांश देखील जाहीर केला आहे. सन २०२२-२३ साठी वैधानिक लेखापरीक्षकांनी बँकेस अ आॅडिट वर्ग दिला आहे. तसेच बँकेने ग्राहकांसाठी डेबिट कार्ड, मोबाईल बँकिंग, युपीआय आदी सुविधा दिल्या आहेत. धायरी व कात्रज येथे बँकेची दोन एटीएम मशीन असून डेटा सुरक्षिततेसाठी बँकेने क्लाऊड कम्प्युटिंग तंत्रज्ञान अवलंबिले आहे.