व्हायोलिन वादन विद्यालयाचा गुरुपौर्णिमा उत्सव
पुणे : गुरुवर्य बा. शं. उपाध्ये यांच्या जन्मशताबदीनिमित्त उपाध्ये व्हायोलिन वादन विद्यालयातर्फे गुरुपौर्णिमा आणि स्नेहमेळाव्याचे आयोजन मित्र मंडळ सभागृहात करण्यात आले होते. पंडित बाळकृष्णबुवा उपाध्ये यांनी 1951 साली स्थापन केलेल्या उपाध्ये व्हायोलीन वादन विद्यालयाच्या 70 वर्षांच्या वाटचालीचा प्रवास एका चित्रफितिद्वारे सर्वांना दाखवण्यात आला.
भाग्यश्री आगाशे आणि अनिकेत गुंडेवार यांनी या चित्रफितीची निर्मिती केली होती. पंडित अतुलकुमार उपाध्ये, शिरीष उपाध्ये, तेजस उपाध्ये आणि राजस उपाध्ये या सर्वांचे गुरुपूजन विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी या वेळेस केले. तसेच गुरुवर्य बा. शं. उपाध्ये यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन उपाध्ये कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले. पंडित अतुलकुमार उपाध्ये यांनी मनोगत व्यक्त करीत बा. शं. उपाध्ये यांच्या आणि विद्यालयाच्या 70 वर्षांच्या वाटचालीतील अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
शिरीष उपाध्ये यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात अमन वरखेडकर यांना गुरुवर्य रा. शं. उपाध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच भाग्यश्री आगाशे यांना हेमलता जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्नेहमेळाव्यास मंजुषा पाटील, भरत कामत, शर्वरी जमेनिस, निखिल फाटक आदी मान्यवर, विद्यालयाचे अनेक आजी-माजी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
अमृता दीक्षित-देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.