रयत प्रबोधिनी, पुणे च्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या १७२ + पोलीस उपनिरीक्षक व इतर गुणवंतांचा पालकांसहित सन्मान सोहळा
पुणे : संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे की मिळालेल्या संपत्तीचा वापर करायला ही नशीब लागत. ही ओवी पीएसआय परीक्षा उतीर्ण झालेल्या मुलांनी लक्षात ठेवावी, ही प्रकृती तुम्हाला सर्व काही मिळवून देते मात्र भोग भोगायच्या वेळेला ती तुम्हाला अशक्त करते, भोग तुमच्या समोर आहेत मात प्रकृती ती तुम्हाला भोगू देत नाही ही या काळातील शिक्षा आहे.
प्रकृतीने दिलेली. भोग तुम्हाला भोगायचे असतील तर तो पैसा कष्टाचा, न्यायचा आणि मेहनतीचा असावा, पैसा मिळाला म्हणजे सन्मान मिळाला असे होत नाही यामुळे पीएसआय झालेल्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची शिकवण अंगिकारावी, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र भगवानगडचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांनी केले.
रयत प्रबोधिनी, पुणे च्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या १७२ + पोलीस उपनिरीक्षक व इतर गुणवंतांचा पालकांसहित सन्मान सोहळा गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे राजाभाऊ चोपदार, रयत प्रबोधिनी चे संस्थापक उमेश कुदळे, शिक्षक विशाल सुतार, विशाल लोंढे, संस्थेचा माजी विद्यार्थी पोलिस उपनिरीक्षक सदाशिव साळुंखे , विक्रम सस्ते, भरत हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रयत भूषण सन्मानाने महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदडा, आंतरराष्ट्रीय खेळाडू सचिन खिलारी व पुणे येथे कोयता हल्ल्यातून युवतीचा प्राण वाचवणारा लेशपाळ जवळगे यांना गौरविण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपक्रमाला पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या.
न्यायाचार्य नामदेव शास्त्री म्हणाले, संत ज्ञानेश्वर माऊली यांना महाराष्ट्र आध्यात्मिक समजतो हे दुर्दैव आहे, माऊली हे सामाजिक आहेत, त्यांनी सव्वा सातशे वर्षांपूर्वी सर्व जातींना एकत्र बांधण्याचे काम केले आहे. लिहिण्याचा अधिकार ज्ञानेश्वर महाराजांनी स्त्रियांना दिला. यामुळेच जनाई – मुक्ताई यांनी अभंग लिहिले. राजीव खांडेकर म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटलांनी निर्माण केलेल्या संस्थेचे नाव आजच्या पिढीने आपल्या उपक्रमांसाठी घेणे म्हणजे सतीचे वाण घेण्यासारखे आहे.
आज स्पर्धेच्या आणि जाहिरातीच्या युगात रयत प्रबोधिनी आपले काम संयतपणे करत आहे. आज स्पर्धा परीक्षेच्या क्लासेस चे पेव फुटलेले आहे अशा काळात मुलांकडून फक्त पैसे न गोळा करता त्यांना योग्य मार्गदर्शन करत प्रवेश नाकारणे ही बाब कौतुकापसद असल्याचे खांडेकर यांनी नमूद केले. तसेच पीएसआय झालेल्या विद्यार्थ्यानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्राचा बारकाईने अभ्यास करून आपले आचरण ठेवावे असा सल्ला दिला.
भगवान गडाच्या स्पर्धा परीक्षा केंद्राची जबाबदारी रयत प्रबोधिनी कडेभगवानबाबा संस्थानच्या वतीने अनेक ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी अनेक शाळा चालविण्यात येतात, संस्थानच्या वतीने मराठवाड्यातील मुलांसाठी एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येत आहे, तीन कोटी रुपये खर्चून संस्थानाने यासाठी सुसज्ज इमारत उभी केली आहे, आगामी दोन महिन्यात ही इमारत वापरता येणार आहे.
इमारत उभारली मात्र ही चालवायची कशी हा प्रश्न संस्थान पुढे होता, यामुळे आज न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांनी रयत प्रबोधिनी ला ही इमारत ताब्यात घ्या आणि केंद्र सुरू करा, असे आवाहन केले आपल्या भाषणात केले, रायतने ही या प्रस्तावाला तत्काळ होकार देत मराठवाड्यातील ऊसतोड कामागरांच्या मुलांना अधिकारी घडविण्याचे भगवानबाबा गड संस्थानचे स्वप्न सत्यात उतरविण्याचा निर्धार व्यक्त केला. इमारतीचा देखभाल खर्च आणि केंद्रात प्रवेश घेणाऱ्या सर्व मुलांचा संपूर्ण खर्च संस्थान करणार असल्याचेही नामदेव शास्त्री यांनी सांगितले.