ग्रॅव्हिटस फाऊंडेशनतर्फे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जागृती
शालेय अभ्यासक्रमात 'गुड टच बॅड टच'चा समावेश व्हावा- अभिनेत्री तनिशा मुखर्जी
पुणे : “मुलांमध्ये चांगल्या-वाईट स्पर्शाची जाणीव करून देणारा ‘गुड टच बॅड टच’ उपक्रम व्यापक होण्यासाठी त्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हायला हवा. लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी अशा उपक्रमांना शासकीय स्तरावरून पाठबळ मिळायला हवे,” अशी अपेक्षा प्रसिद्ध अभिनेत्री तनिशा मुखर्जी यांनी व्यक्त केली.
आपल्याला जाणवणाऱ्या चुकीच्या स्पर्शाबद्दल वेळीच आवाज उठवायला हवा, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘गुड टच बॅड टच’ या उपक्रमाविषयी तनिशा मुखर्जी यांनी बुधवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे उपस्थित होत्या.
शाळांमधून हा उपक्रम राबवून मुलांमध्ये स्पर्शज्ञान जागृत करण्याचे महत्वाचे काम सुरु असल्याचे सांगून मुखर्जी यांनी उषा काकडे व फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी काकडे यांनी ग्रॅव्हिट्स फाउंडेशन व ‘गुड टच बॅड टच’ उपक्रमाचा लेखाजोखा असलेली पुस्तिका देऊन मुखर्जी यांचे स्वागत केले.
तनिशा मुखर्जी म्हणाल्या, “लहान मुलांवरील, महिलांवरील अत्याचाराच्या घटना दुःखदायक आहेत. हे अत्याचार रोखण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीसह समाजात जागृती होणेही तितकेच महत्वाचे आहे. अनेकदा अशा घटना दाबण्याचा प्रयत्न केला जातो. लहान मुले कधीही खोटे बोलत नाहीत. त्यामुळे पालकांनी, शिक्षकांनी मुलांशी नियमित संवाद ठेवून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. मनमोकळा संवाद ठेवला पाहिजे. आपल्या शरीरावर आपला अधिकार असतो. त्यामुळे आपल्याला न आवडणाऱ्या स्पर्शावर प्रतिक्रिया दिली पाहिजे. विश्वासातील व्यक्तीला याबाबत अवगत करावे. या उपक्रमात मी स्वतः सहभागी होणार असून, येत्या काळात गुड टच व बॅड टच याविषयी जागृती करण्यावर भर देणार आहे.”
उषा काकडे म्हणाल्या, “दिल्लीतील निर्भया घटनेनंतर सामाजिक जाणिवेतून आम्ही हा उपक्रम हाती घेतला. सुरुवातीला शाळांमधून, पालकांकडून काहीसा नकार मिळाला. परंतु, नंतर हा उपक्रम अतिशय यशस्वी झाला. ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या माध्यमातून पुण्यातील विविध शाळांमध्ये हा उपक्रम सुरु आहे. आजवर साडेचार लाख विद्यार्थ्यांना चांगल्या व वाईट स्पर्शाची जाणीव करून दिली आहे. प्रशिक्षित स्वयंसेवकांची टीम यामध्ये काम करते. अनेक घटना यातून समोर येत असून, त्यावर उपाययोजना केल्या जात आहे. जागृतीसाठी ‘उडने दो’ हा लघुपट बनविला आहे.
‘गुड टच बॅड टच’ उपक्रम देशव्यापी व्हावा, यासाठी आम्ही सरकारकडेही मागणी करणार आहोत.”