विलो ग्रुपतर्फे केसुर्डी येथे नवा उत्पादन प्रकल्प सुरू
केसुर्डी: बहुराष्ट्रीय विलो ग्रुपने भारतात पुण्याजवळील केसुर्डी येथे एक नवीन उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प ९४ हजार चौरस मीटर जागेवर उभारण्यात आला असून, तो अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. येथे भारत, मध्यपूर्व, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियातील बाजारपेठांसाठी पाणी व्यवस्थापनासाठी उपयुक्त प्रीमियम पंप प्रणाली तयार केली जाणार आहे.या प्रकल्पामुळे विलो ग्रुपचे आता जगभरात १६ उत्पादन प्रकल्प झाले आहेत.
नव्या उत्पादन प्रकल्पाच्या उदघाटनप्रसंगी विलो ग्रुपचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऑलिव्हर हर्म्स म्हणाले, “या प्रकल्पाच्या उद्घाटनासह विलोच्या उत्पादन जाळ्याचा विस्तार झाला आहे. त्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. नवीन प्रकल्पामुळे जागतिक व्यापारात भारताचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले आहे. अशा प्रकारे भारतातील उत्पादन क्षमतेचा विस्तार विलो समूहाच्या जागतिक ‘प्रदेशनिहाय विस्तार’ धोरणानुसार आहे. या धोरणासह, विलोचे उद्दिष्ट स्थानिक पातळीवर उत्पादित केलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आहे.
स्थानिक उत्पादनांचा वापर करून प्रादेशिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यावर कंपनीचा भर आहे. या प्रकल्पामुळे आम्ही भारतात रोजगार निर्मितीही करत आहोत”, असे हर्म्स यांनी सांगितले. या नव्या प्रकल्पामुळे सुमारे १५०० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
विलोने हा नवा प्रकल्प उभारण्यासाठी नावीन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर केला असून, पर्यावरणपूरक प्रीफेब्रिकेटेड भाग वापरले आहेत. ऊर्जा व्यवस्थापन आणि जल उपचार प्रणाली वापरून कार्बन उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी केले आहे.नवीन प्रकल्प उभारताना सुरुवातीपासूनच पर्यावरणीय बाबींचा विचार केला जातो, असे विलो समूहाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आणि कार्यकारी मंडळाचे सदस्य जॉर्ज वेबर यांनी सांगितले.
फॅक्टरी रूफटॉपवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून, यामुळे कार्बन उत्सर्जन वार्षिक १२०० टन कमी होते. कार्बन-न्यूट्रल होण्याच्या दिशेने वाटचाल करताना कंपनीने सौर ऊर्जा वापरावर भर दिला असून, २०२५ पर्यंत कंपनीच्या जगभरातील सर्व साइट्सवर हे उद्दिष्ट साध्य करण्याचे ध्येय आहे.”या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले असून येथे निर्माण होणारी सर्व उत्पादने विलोच्या प्रीमियम संकल्पनेशी पूर्णपणे सुसंगत आहेत”, असेही वेबर यांनी सांगितले.
केसुर्डी येथील या प्रकल्पात अत्याधुनिक मशिन्स आणि उत्पादन सुविधांचा वापर केला जातो. विलोच्या पोर्टफोलिओमधील सर्वात मोठी उत्पादने, जसे विलो व्हर्टीकल टर्बाइन पंप, ज्याचा उपयोग पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेती आणि पूर नियंत्रणात केला जातो. त्यांची चाचणी करण्यासाठी, येथे आशियातील सर्वात मोठे चाचणी बेसिन तयार केले आहे. “केसुर्डी मध्ये उत्पादित पंप प्रणाली ऊर्जा, पाणी आणि अन्नपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देते, याकडे हर्म्स यांनी लक्ष वेधले.