विश्वशांती आणि शाश्वत उपायांना प्रोत्साहन देणारीजी २० इंटरफेथ समिट ५ सप्टेंबर पासून
विविध देशातील १०० पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होणार
पुणे: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी पुणे, जी २० इंटरफेथ अलायन्स फॉर सेफर कम्युनिटीज आणि यूएसए येथील जी २० इंटरफेथ फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने जी २० इंटरफेथ समिटचे आयोजन करण्यात येत आहे. ही परिषद दि.५ ते ७ सप्टेंबर २०२३ दरम्यान लोणी-काळभोर येथील जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटामध्ये होणार आहे.
या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जी २० इंटरफेथचे अध्यक्ष डब्ल्यू कोल ड्यूराम ज्यू., सीईओ किंग हुसेन, प्रा.डॉ.कॅथरिना मार्शल, बाही समुदायाच्या मार्जीया दलाल, बिशप फादर फेलिक्स मचाडो हे असतील. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. अमेरिकेतील प्रा.डॉ. अशोक जोशी यांची उपस्थिती असेल.अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल वि. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, अमेरिकेतील डॉ. संजय कामतेकर व डॉ.मिलिंद पात्रे उपस्थित होते.
राहुल कराड पुढे म्हणाले, तरूण, स्त्रिया, पर्यावरण यांसारख्या विषयावर भारतामध्ये जी २० या परिषदा झालेल्या आहेत. इंटरफेथ परिषद आमची संस्था करीत आहे. यूएस, यूके, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका, ब्राझिल, जर्मनी, इटली, टर्की व साऊथ आफ्रिका इत्यादी देशातील १०० पेक्षा जास्त प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. यामाध्यमातून जगाला विश्वशांती, सर्वधर्म समभाव व वैश्विक एकात्मतेचा संदेश दिला जाईल.
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी सांगितले की, या कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक आव्हानांना तोंड देणे आणि जगात शांतता नांदावी यासाठी धार्मिक व्यक्तींबरोबरच विविध विषयातील तज्ज्ञ व्यक्ती एकत्रित येत आहेत. या परिषदेचा समारोप ७ सप्टेंबर रोजी संध्या.५ वा. विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी केरळचे राज्यपाल डॉ. आरिफ मोहम्मद खान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी सांगितले की, तीन दिवस चालणार्या या कार्यक्रमात एकूण १५ सत्रे असतील. यात धर्म, तत्व आणि तंत्रज्ञान, महिला सबलीकरण, असुरक्षित समुदाय, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ,सामाजिक शांतता आणि शांतता निर्माण, अन्न सुरक्षा, शिक्षणासंदर्भातील जागतिक दृष्टिकोण, आरोग्य सेवा, मुलांचे व असुरक्षित नागरिकांचे संरक्षण करणे, वातावरण, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसाचे संरक्षण, मानवी तस्करी आणि जागतिक युवा शांती संवादा सारख्या विषयांचा समावेश आहे.
या सत्रांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक यांसारख्या विविध विषयातील १०० पेक्षा अधिक तज्ज्ञ वक्ते संबोधित करतील. यात प्रामुख्याने अमेरिकेतील मायकल यंग, कॅथरिना मार्शल, बानी दुग्गल, साध्वी भगवती सरस्वती, अॅड्रॅग इटगॉवा, पीटर योभा, पीटर पेटकॉफ आहेत. त्याच प्रमाणे राष्ट्रीय स्तरावरील सिद्धार्थ काक, ए.के.मर्चंट, सेवानिवृत्त न्यायधीश रोशन दळवी, अधिक कदम, शैलेंद्र शर्मा, डॉ. महम्मंद गुलरेज, कर्नल बिनॉय कोशी, वसंत शिंदे, पल्लवी घोष, अजित सिंग या सारखे अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. तसेच २ हजार पेक्षा अधिक नागरिक सहभागी होणार आहेत.
अधिक माहितीसाठी https://www.g20interfaith.org/2023-pune-india/ वेबसाइट पाहावी.