केंद्रीय माहिती व प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांच्या हस्ते सुदर्शन केमिकलच्या वैश्विक मुख्यालयाचे पुण्यात उद्घाटन
पुणे : रंगद्रव्ये व रासायनिक उत्पादन क्षेत्रातील अग्रणी उद्योग समूह असलेल्या सुदर्शन केमिकल प्रायव्हेट लिमिटेडच्या वैश्विक मुख्यालयाचे उद्घाटन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा (आयएएस) यांच्या हस्ते शुक्रवारी बाणेर येथे झाले. प्रसंगीविशेष अतिथी म्हणून पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ, पद्मविभूषण डॉ. कांतीलाल संचेती यांची उपस्थिती होती.
सुदर्शन केमिकलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी यांच्यासह संचालक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.अपूर्व चंद्रा म्हणाले, “जगातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या सुदर्शन केमिकलने आपला विस्तार असाच करत राहावा. महाराष्ट्रामध्येही त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. इज ऑफ डोइंग बिझनेस, मेक इन इंडिया याचा सुदर्शन केमिकल चांगला लाभ झाला आहे. मला विश्वास आहे, या पुढील काळात सुदर्शन केमिकल आणखी वेगाने प्रगती करेल आणि जगातील सर्वात मोठी कंपनी होण्याचा मान मिळवेल.
महाराष्ट्रासह भारताचे नाव जगात उंचावेल. या नव्या कार्यालयाच्या माध्यमातून सुदर्शन केमिकल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगदान देईल.”विक्रम कुमार, सुनील रामानंद व डॉ. कांतीलाल संचेती यांनी सुदर्शन केमिकलच्या दैदिप्यमान वाटचालीचा गौरव केला. सुदर्शन केमिकलने आगामी काळात विस्तार करत जगभरात पुण्याचे, महाराष्ट्राचे व भारताचे नाव मोठे करावे. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेत योगदान द्यावे. मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करावी, अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी सुदर्शन केमिकल कंपनीला शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात राजेश राठी यांनी सुदर्शन केमिकलच्या ७० वर्षांतील कामगिरीचा आढावा घेताना रासायनिक उत्पादन क्षेत्रात कंपनीने आजवर केलेली प्रगतीचा, जागतिक स्तरावर झालेला विस्तार, उद्योगसह सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाविषयी माहिती दिली. शिवालिका पाटील यांनी सूत्रसंचालन केले.