पुणे: आयुष्य भर अध्यात्म, विज्ञान आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी केलेल्या कार्याबद्दल यूएसए येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी, वेस्टमिन्स्टर युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ यूटाह यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध दूरदर्शी, शिक्षणतज्ञ, शांतीदूत प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांचा ब्रांझचा पुतळा उभारण्यात येत आहे. प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून आणि कुशल नियोजनातून विश्वराजबाग, लोणी काळभोर, पुणे येथे साकार झालेल्या जगातील सर्वात मोठ्या शांती घुमट जवळ हा पुतळा उभारण्यात आला आहे.
याचे अनावरण शिक्षण दिन म्हणजेच मंगळवार, ५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.१५ वा. करण्यात येणार आहे. अशी माहिती ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष व धार्मिक नेते डी. टॉड क्रिस्टोफरसन यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी यूएसए येथील स्पॅन कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंगचे अध्यक्ष आणि सीईओ किंग हुसेन, यूएसए येथील शिल्पकार डी.जे. बॉडन, धार्मिक स्वातंत्र्य आणि व्यवसाय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. ब्रायन ग्रिम आणि यूएसए येथील मायक्रोलिन एलएलसीचे संस्थापक डॉ. अशोक जोशी उपस्थित होते. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड उपस्थित होते.
डॉ. अशोक जोशी म्हणाले, हा दिव्य आशिर्वाद सोहळा सर्व धर्मातील अग्रगण्य धर्मगुरूंच्या उपस्थितीत पार पडेल. यावेळी रामविलास वेदांती, महंत रामदास, राहुल भन्ते बोधी, आयझॅक मळेकर, लेसन आझादी, आचार्य लोकेश मुनी, एडिसन सामराज, मास्टर मेहर मूस, सईद अजिज निजामी, बाबा बलविन्दर सिंग यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच यूएसए येथील रोनाल्ड गेल यांच्या बरोबर शेकडो परदेशी पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
जीवनाच्या अभूतपूर्व वाटचालीत आदरणीय शिक्षणतज्ञ डॉ. विश्वनाथ कराड यांना त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल आणि आंतरधार्मीय संवादाला चालना देण्याबरोबरच अखंड निष्ठेबद्दल हा सन्मान करण्यात येत आहे.प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांचा पुतळा यूएसए येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीचे शिल्पकार डी.जे. बॉडन यांनी ब्रांझ मध्ये निर्मित केला आहे. प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांच्या करारी, कर्तव्य निष्ठेची साक्ष देणारा अद्वितीय विस्मयकारक विशाल ब्रांझचा हा पुतळा १२ फूट उंचीचा आहे.