राजबाग लोणी येथे प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांच्या पुतळ्याचे अनावरण
डॉ. विश्वनाथ कराड यांना अहिंसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२३ घोषित
पुणे, दि. ५ सप्टेंबरः शिक्षण व अध्यात्माचा अंगीकार करून विश्वशांतीसाठी आपले जीवन समर्पित करणारे विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ कराड हे एकमेवाद्वितीय व्यक्ती आहेत. वसुधैव कुटुंबकम् आणि एकम् सत विप्रा बहुधा वदंती या तत्त्वांचे पालन केले आहे. त्यांच्या प्रेरणेने संपूर्ण समाज शांततेच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करेल. त्यांचे विचार प्रत्येक व्यक्तीला शांतीच्या दिशेने घेऊन जातील. घुमट पाहण्यासाठी येणार्या प्रत्येकासाठी हा पुतळा प्रेरणादायी ठरेल. अशी भावना यूएसए येथील स्पॅन कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिगचे अध्यक्ष आणि सीईओ किंग हुसेन यांनी व्यक्त केली.
शिक्षक दिनानिमित्त प्रसिद्ध दूरदर्शी, शिक्षणतज्ञ आणि शांतीदूत प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांच्या ब्राँझच्या पुतळ्याचे ऊनावरण राजबाग लोणी काळभोर येथे सर्व धर्मगुरूंच्या उपस्थितीत झाले.यावेळी डी.जे. बॉडन आणि यूएसए येथील मायक्रोलिन एलएलसीचे संस्थापक डॉ. अशोक जोशी, डेव्हिड हंसमन, रोनाल्ड गेल, डॉ. रामविलास वेदांती, महंत रामदास, राहुल भन्ते बोधी, आयझॅक मळेकर, डॉ. लेसन आझादी, आचार्य लोकेश मुनी, एडिसन सामराज, मेहर मास्टर मूस, सईद अजीज निजामी, मौलाना अंसारी आणि ब्रह्माकुमारी निलीमा दिदी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड उपस्थित होते.
शिक्षक दिनानिमित्त प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांचा पगडी, घोंगडी, सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि वीणा देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच जैन धर्माच्या वतीने लोकेश मुनी यांनी डॉ. विश्वनाथ कराड यांना अहिंसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. किंग हुसेन म्हणाले, भारतीय शिक्षक दिनानिमित्त अशा महान शिक्षकाच्या पुतळ्याचे अनावरण करणे म्हणजे जणू उत्सवच आहे. एक उत्कृष्ठ अभियंता असण्याबरोबरच ते आपले जीवन शांततेसाठी व्यतीत करीत आहेत. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आज देशात जी २० बैठक होत आहे. ही अभिमानाची बाब आहे.
आपली भावना व्यक्त करताना डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, मी आज माझे विचार शब्दात व्यक्त करू शकत नाही. जीवनाचा उद्देश काय आहे, पुढे काय करायचे, शिक्षणाची नवीन संकल्पना काय असेल हे समजून घेणे महत्वाचे आहे.
डी. टॉड क्रिस्टोफरसन म्हणाले, शिक्षण ही यशाची गुरूकिल्ली आहे हे डॉ. कराड यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी मूल्याधिष्ठीत शिक्षणावर अधिक भर दिला आहे.ब्रायन ब्रॅन म्हणाले, अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून डॉ. कराड विद्यार्थ्यांना जे शिक्षण देत आहेत ते जगातील सर्वोत्तम आहे. भारत जगात ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल. चांद्रयान ३ने भारताचे भाग्य बदलले आहे.
वसुधैव कुटुंबकम् हे भारतीय तत्वज्ञान जीवनाची दिशा दाखवते. महात्मा गांधी, पं.नेहरूंसारखेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ही याच तत्त्वावर कार्य करीत आहेत. डॉ. राम विलास वेदांती म्हणाले, धार्मिक व राष्ट्रीय एकात्मतेचे पुरस्कर्ते डॉ. कराड आहेत. ते सर्वांना घेऊन बरोबर जाणारे आहेत. या घुमटात विश्वदर्शन घडते. सर्व धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचे काम ही त्यांनी केले. देशात पुणे आणि दिल्ली येथे जी २० शिखर परिषदत होत आहे. ही अभिमानाची बाब आहे. आचार्य लोकेश मुनी म्हणाले, या घुमटात जी २० सुरू होणे ही शाश्वत विकासाची पहिली पायरी आहे, तसेच समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्वतः बरोबरच इतरांच्या विचारांचा आदर करायला शिकले पाहिजे.
डॉ. कराड यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना २०२३ सालचा अहिंसा आंतरराष्ट्रीय परस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.यानंतर हनुमान गढ अयोध्याचे महंत रामदास, भंते महाथेरो राहुल, आयझॅक मळेकर, एडिसन सामराज, डॉ. मेहर मास्टर मूस यांनी आपल्या मनोगतात डॉ. कराड यांच्या कार्याचे कौतुक केले.प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. अशोक जोशी यांनी आभार मानले.