डॉ. संजय चोरडिया, डॉ.एन.जे.पवार, डॉ.देविदास वायदंडे व डॉ.प्रशांत साठे यांना यंदाचा ७ वा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्तर्फे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
पुणे : जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या वतीने देण्यात येणारा ७ वा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा डॉ.संजय चोरडिया, डॉ.एन.जे.पवार, डॉ.देविदास वायदंडे आणि डॉ.प्रशांत साठे यांना प्रदान करण्यात येणार आहे. शुक्रवार, दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता न-हे येथील संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. पुणेरी पगडी, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुरस्कार वितरण सोहळ्याला खासदार हेमंत पाटील, आमदार संग्राम थोपटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, अॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ५ वा प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक वितरण समारंभ देखील होणार आहे.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यांतर्गत आदर्श शिक्षण संस्थाचालक म्हणून सुर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्चे अध्यक्ष डॉ.संजय चोरडिया, आदर्श कुलगुरु म्हणून डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.जे.पवार, आदर्श प्राचार्य म्हणून एम.एस.काकडे कॉलेज सोमेश्वरनगरचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे आणि बी.एम.सी.सी. कॉलेजेचे प्रा.डॉ.प्रशांत साठे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबर त्यांच्यातील कलागुण जोपासण्यासाठी शिक्षणसंस्थेकडून प्रयत्न केले जातात. त्यासाठी वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामधील हा एक कार्यक्रम आहे. माणूस पैशांनी मोठा झाला तरी आपल्या शिक्षकांचे ऋण विसरू नयेत. त्यांचा आदर करणे ही विद्यार्थ्यांची जबाबादारी आहे. अशा शिक्षकांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.