हजारो लखलखत्या दिव्यांनी उजळला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा परिसर
संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला 'रिपाइं', सम्यक ट्रस्ट व संविधान सन्मान समितीचा उपक्रम
पुणे : भीम अनुयायांनी लावलेल्या पाच ते सहा हजार लखलखत्या दिव्यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा परिसर उजळून निघाला. संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), सम्यक ट्रस्ट आणि संविधान सन्मान समितीच्या वतीने शनिवारी दिवे प्रज्वलित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन करण्यात आले.
माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत पहिला दिवा प्रज्वलित करून या दीपोत्सवाची सुरुवात झाली. प्रसंगी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनवणे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, हिमाली कांबळे, प्रा. डॉ. निशा भंडारे, बाबुराव घाडगे, श्याम सदाफुले, निलेश रोकडे, मुश्ताक शेख, रजाक सय्यद, आसिफ शेख, रिजवान शेख, मेहमूद खान आदी उपस्थित होते.
बाळासाहेब जानराव म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे लाखो लोकांचे जीवन प्रकाशमय झाले आहे. अमृतमहोत्सवी संविधान दिनाच्या निमित्ताने दिव्यांना प्रज्वलित करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्याचा हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवत आहोत. यातून प्रेरणा घेऊन संविधानाचा प्रकाश समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य व्हायला हवे.”
डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत. त्यामुळेच आज आपण सन्मानाने जगत आहोत. संविधानाचा जागर करण्यासाठी बालपणापासूनच त्याविषयीचे शिक्षण देण्याची गरज आहे. शाळा-महाविद्यालयांतून संविधानाचे धडे द्यायला हवेत.”सुनीता वाडेकर यांनी संविधानाचे महत्व विशद करत संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
संजय सोनावणे यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचे नमूद केले.