क्रीडापुणेमहाराष्ट्रविशेष

राष्ट्रीय मोटो क्रॉस स्पर्धेत महाराष्ट्र प्रथम

पुण्याच्या २३ वर्षीय ऋग्वेद बारगुजे ची कामगिरी : सलग दुसऱ्यांदा पटकाविले विजेतेपद

पुणे : तब्बल वीस वर्षानंतर सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय मोटो क्रॉस स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथम स्थान पटकाविले आहे. मैसूर येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेमध्ये पुण्याच्या २३ वर्षीय ऋग्वेद बारगुजे याला सलग दुसऱ्यांदा बेस्ट रायडर व राष्ट्रीय चॅम्पियनशिप हा किताब देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेसाठी ऋग्वेदचे वडील आणि आंतरराष्ट्रीय मोटो क्रॉस विजेते ज्ञानेश्वर बारगुजे यांनी मार्गदर्शन केले.

गॉडस्पीड चे शाम कोठारी, प्रायोजक एमआरएफ मोग्रीप राष्ट्रीय सुपर क्रॉस चॅम्पियनशिप, मुख्य प्रायोजक संरक्षक टीव्हीएस रेसिंग आणि एम एक्स स्टोअर एफएक्सआर यांचे सहकार्य ऋग्वेदला मिळाले.या राष्ट्रीय स्पर्धेसाठी टीव्हीएस कारखान्यात सराव करताना ऋग्वेदचा उजव्या हाताचा अंगठा निखळला होता. परंतु वेदनाशामक औषध घेऊन त्याने ही शर्यत जिंकली.

स्पर्धेमध्ये एकूण सहा फेऱ्या झाल्या. कोइंबतूर, वडोदरा, नाशिक, बेंगलोर, मंगळूर, मैसूर या ठिकाणी या फेऱ्या झाल्या. या सर्व फेऱ्यांमध्ये ऋग्वेद अव्वल ठरला.मागील वर्षी कोइंबतूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ऋग्वेद अव्वल ठरला होता. त्यानंतर यावर्षीही त्यांनी सर्वोत्तम रायडरचा मान मिळवला.

ऋग्वेद बारगुजेने २०१२ पासून रेसिंग ला सुरुवात केली. तो पहिल्याच शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला, हे बक्षीस त्याचा आत्मविश्वास उंचावणारे आणि पुढील दिशा निश्चित करणारे ठरले. यानंतर ऋग्वेदने सरावावर भर दिला. तो श्रीलंका ज्युनिअर चॅम्पियनशिप आणि इंडियन ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये सहभागी झाला, यात त्याने बाजी मारली. येथेच त्याच्या कारकिर्दीने वेग पकडला.

२०१६ मध्ये ऋग्वेद एस एक्स टू प्रकारात एमआरएफ प्रायव्हेट फॉरेन ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी झाला. यात ही त्याने विजेतेपद पटकावले. यानंतर २०१७ मध्ये त्यांनी एस एक्स वन डर्ट ट्रॅक नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये भाग घेतला, यातही तो करंडक पटकावून मायदेशी परतला. २०१८ मध्ये त्याच्या प्रगतीचा आलेख चढता असताना त्याच्या कारकीर्दीला अपघातामुळे ब्रेक लागला यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे रेसिंग पासून तो दोन वर्षे बाजूला पडला.

अखेर २०२२ मध्ये त्याने एमआरएफ एसएक्स वन इंडियन नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये बाजी मारली. त्याच्या या यशामुळे तब्बल २१ वर्षानंतर या शर्यतीत महाराष्ट्राला जेतेपद मिळाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!