पुणे जिल्हा अग्रवाल समाजातर्फे आयोजित ‘अपने अपने राम’ तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन
कलियुगातील संशयाला दूर करणारी 'रामकथा'- प्रख्यात कवी डॉ. कुमार विश्वास
पुणे : श्रीराम कथा भारतीयांच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या ह्रदयात आहे. प्रत्यक्षात प्रत्येक भारतीयांच्या ‘डीएनए’ मध्ये रामकथा सामावलेली आहे. विविध ठिकाणी साधू संत ही कथा असंख्य लोकांपर्यंत पोहोचवित आहेत. कलियुगाच्या वृक्षावर बसलेल्या संशयरूपी पक्षाला दूर करणारी ही कथा असून आजच्या काळात श्रीराम कथेची संजीवनी युवकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कवी डॉ. कुमार विश्वास यांनी केले.
पुणे जिल्हा अग्रवाल समाजातर्फे ‘अपने अपने राम’ या तीनदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन आरटीओ जवळील एसएसपीएमएस च्या मैदानात करण्यात आले आहे. त्याच्या पहिल्या दिवशी (शुक्रवा, दि.१५ डिसेंबर) डॉ. कुमार विश्वास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अयोध्येमध्ये जानेवारी २०२४ मध्ये पूर्णत्वास येत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर स्थापनेच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीतमय राम ऊर्जा सत्राकरिता पुणे, पिंपरी-चिंचवड सह जिल्ह्यातून ५ हजार हून अधिक समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या कार्यक्रमाला सहाय्य करणाऱ्या नामवंत व्यक्तींचा सन्मान देखील करण्यात आला.
डॉ. कुमार विश्वास म्हणाले, धर्म आणि अध्यात्माची चेतना ही सांसारिक कार्य झालेल्या व्यक्तींसाठी असते, हा समज आहे. भागवत, गीता हे ग्रंथ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत. मात्र, आपण ते किती वेळा वाचतो, हे महत्वाचे आहे. आपण आपले बँक खाते आणि त्यातील बॅलन्स किती वेळा पाहतो आणि हे ग्रंथ किती वेळा वाचतो, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.
ते पुढे म्हणाले, महर्षी वाल्मिकी यांनी ही कथा आपल्याला ऐकविली. ते आद्य कवी होते. त्यानंतर गीतेला देखील कवितेच्या रूपात सांगण्यात आले. कवी हा द्रष्टा असतो, त्याला पुढचे पाहण्याची शक्ती असते. रामकथा ही मधुर, सोपी आणि तितकीच मनोहारी आहे. त्यामुळे या कथेचे विविध प्रकारे वाचन व श्रवण करून यातून अनेक गोष्टी आपण शिकायला हव्या, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी यांच्या कार्याविषयी अनेक गोष्टी देखील सांगितल्या.
श्रीराम कथा आणि वर्तमानात प्रभू श्रीरामांच्या जीवनातील मूल्यांचे महत्व अत्यंत सोप्या शब्दात मांडत तरुणाईला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामनामाचा जयघोष करण्यात आला. तर, देवा श्री गणेशा, श्रीराम जानकी बैठे हे मेरे सीनेमे, सजादो घर को दुल्हन सा.. मेरे घर राम आये है यांसह विविध गीतांच्या सादरीकरणाने सूरमयी प्रारंभ झाला. कविता तिवारी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
*भारतीय इतिहास व अध्यात्माचा इतिहास पुण्यात लिहिला गेला : डॉ. कुमार विश्वास*
नामदार गोखले, रानडे यांच्यापासून ते ओशो रजनीश यांच्यापर्यंत विविध क्षेत्रातील दिग्गजांचे मोठे कार्य पुण्यामध्ये झाले. पुण्याला आयटी हब म्हटले जाते. पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीपासून जगविख्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर देखील आहे. भारतीय इतिहास व अध्यात्माचा इतिहास देखील येथे लिहिला गेला. त्यामुळे येथे आले की मनाला वेगळा आनंद मिळतो.