कर्करोगाच्या जनजागृतीसाठी आयोजित “कॅन्सल द कॅन्सर” उपक्रमाचे उद्घाटन
येणाऱ्या काळात कॅन्सरची भयानक लाट येऊ शकते; त्यामुळे सावध रहा...! शेखर मुंदडा यांचे प्रतिपादन
पुणे, शिवाजीनगर: एकतर कॅन्सर होऊ नये आणि जर झालाच तर पहिला टर्म मध्ये त्यावर निदान करणे महत्त्वाचं असतं. हा आजार लवकर कळत नाही; तिसऱ्या आणि चौथ्या स्टेप वर गेल्यानंतर आपल्या हातात काही राहत नाही. आता प्रमाण जरी कमी असलं तरी येणाऱ्या काळात हा कॅन्सर भयानक रूप घेऊन प्रत्येक घरात दिसू शकतो. आमच्या कुटुंबामध्येच मी कॅन्सर जवळून अनुभवला आहे. त्यामुळे आळस सोडून आरोग्याची काळजी घ्या आणि स्वतःची तपासणी करा असे आवाहन महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी केले.
काऊडिग्नीटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशन या संस्थेच्या वतीने कर्करोगाच्या जनजागृतीसाठी आयोजित “कॅन्सल द कॅन्सर” या तीन दिवशीय उपक्रमाचे उद्घाटक म्हणून शेखर मुंदडा बोलत होते. या प्रसंगी प्रसिध्द डॉ. पियुश सक्सेना, काऊडिग्नीटी चे संस्थापक, ज्येष्ठ गो सेवक सूर्या पुजारी, व्यवसाय मार्गदर्शक एस. एस. सावंत, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सपकाळ, श्वेता जाजू, गरिमा कवठेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमांतर्गत २४ आणि २५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ दरम्यान मोफत कॅन्सर तपासणी, प्रसिद्ध डॉक्टरांचा परिसंवाद व मार्गदर्शन केले जाईल.
शेखर मुंदडा पुढे बोलताना म्हणाले, प्रदूषण युक्त हवा आणि केमिकल युक्त जमिनीतून आरोग्याचा धोका वाढत चालला आहे. लोकांना सर्व गोष्टी लवकर पाहिजे असल्यामुळे शेतीचे पिके, फळे, भाजीपाला लवकर पिकवण्यासाठी केमिकलचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. हा चिंतेचा विषय असून यावर गोसेवा आयोग काम करेल आणि त्यावर आधारित सिनेमा देखील लवकरच प्रेक्षकांसमोर येईल.
डॉ. पियुष सक्सेना म्हणाले, आपल्या शरीरात कॅन्सर होऊच नये यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज बनली असून त्यासाठी स्वतःहून नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे. पूर्वी लोक जंगलात राहायचे नैसर्गिक अन्न खायचे त्यामुळे निरोगी जीवन जगत असे. परंतु आता शहराकडे नागरिकांचा कल असल्याने अनैसर्गिक खानपान आणि प्रकृती पासून दुरावा हा शरीरामध्ये विविध आजार उत्पन्न करण्याचे सर्वात मोठे कारण बनले आहे. क्लिजिंग थेरेपी द्यारे आपण आपले आरोग्य कसे सुरक्षित ठेवू शकतो यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, ज्येष्ठ गोसेवक सूर्या पुजारी यांनी प्रस्ताविकेमध्ये उपक्रमाची माहिती दिली. व्यवसाय मार्गदर्शन एस. एस. सावंत आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश सपकाळ यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव तर आभार प्रणव थोरात यांनी मानले.