पुणे : भारताच्या उत्तर टोकाकडून दक्षिण टोकाकडे कोणत्याही बाह्य साहाय्याविना चौघा ज्येष्ठांनी सायकलवारी करीत ‘ज्ञान की ज्योत’मधून तंदुरुस्त भारत, नवीन शिक्षण धोरण याबाबत जागृती केली. काश्मीर ते कन्याकुमारी असा ३८०० किलोमीटरचा सायकल प्रवास या चार ज्येष्ठांनी अवघ्या ३२ दिवसांत पूर्ण केला. त्यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल पुण्यातील विविध संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या अनुभव कथनाने उपस्थित भारावून गेले.
पुण्यातील संजय कट्टी (६५ वर्ष) आणि मोनिष चक्रवर्ती (५२ वर्ष), तर डेहराडूनचे अनुभवी जोडपे विश्व धीमान (वय ७० वर्षे) आणि कमलजीत सिंग (वय ७४ वर्षे) यांनी हा महत्त्वाकांक्षी आणि आव्हानात्मक स्वयं-समर्थित (कोणतेही बॅकअप वाहन नाही) अशी ही सायकलिंग मोहीम श्रीनगर (काश्मीर) ते कन्याकुमारी (तामिळनाडू) यशस्वीपणे पूर्ण केली.
हाबिन्सन पर्सनॅलिटी अँड आंत्रप्रेन्युअर स्कुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रिसर्च पार्क फाउंडेशन, पुणे विद्यार्थी गृह, अस्पायर स्किल्स आणि यंग सिनियर्स या संस्थांच्या वतीने पुण्यातील सायकलस्वार संजय कट्टी, मोनिष चक्रवर्ती यांचा सत्कार करण्यात आला. पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, संचालक सुनील रेडेकर, हाबिन्सनचे संस्थापक अदनान सिद्दीकी, यंग सिनिअर्सचे भुवनेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यंग सिनीयर्स ग्रुपच्या गौरी पटवर्धन यांनी संजय कट्टी आणि मोनिष चक्रवर्ती यांची ओळख करून दिली व त्यांच्या विविध सायकल आणि गिर्यारोहण मोहिमांची माहिती दिली. पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी अफान शेख आणि आदित्य पाटील यांनी कट्टी व चक्रवर्ती यांची मुलाखत घेत सायकल सफरी, गिर्यारोहण, त्यासाठी लागणाऱ्या मानसिक आणि शारिरीक तयारीबद्दल जाणून घेतले. कार्यक्रमासाठी यंग सिनीयर्सचे लोकेश मराठे व डॉ. अपर्णा कुलकर्णीं यांनी विशेष सहकार्य केले.
यंग सिनीयर्सचे दत्तात्रेय गोखले, सुप्रिया चक्रवर्ती, यतीन जोशी, गौतम भिंगानिया, हेमा राव उपस्थित होते. इलेक्ट्रोमेडिक्सचे ठाकूरदेसाई व स्वानंद यात्राचे सौरभ कुलकर्णी उपस्थित होते. यंग सिनियर सायकलिस्ट ग्रुपचे प्रीती म्हस्के यांनी संजय कट्टी यांचे, तर प्रा. दत्ता गोखले यांनी चक्रवर्ती यांचे कौतुक केले.
संजय कट्टी म्हणाले, “या सायकलिंग मोहिमेची ‘सक्षम बनो, तंदुरस्त रहो, हम फिट तो भारत फिट, जय हिंद’ ही घोषणा होती. भारताच्या उत्तर ते दक्षिण सायकल मोहिमेची सुरुवात लाल चौक (श्रीनगर) येथून २७ नोव्हेंबरला झेंडा दाखवून झाली आणि १ जानेवारी २०२४ रोजी विवेकानंद स्मारक (कन्याकुमारी) येथे सूर्योदयास समारोप झाला. या ३२ दिवसांत ३८७० किलोमीटर सायकल चालवून १२ राज्ये पार केली आहेत. या प्रवासात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आणि प्रमुख शहरे पार करताना अनेक चांगले अनुभव आले.”
“ज्ञान मिळवा व इतरांना समृद्ध करा, तंदुरुस्त राहा व इतरांना प्रेरित करा, या संदेशाचा प्रचार करत आम्ही जम्मू-काश्मीर (श्रीनगर), पंजाब (अमृतसर, लुधियाना, अंबाला), हरियाणा (पानिपत), दिल्ली (नवी दिल्ली), उत्तर प्रदेश (आग्रा, मथुरा, झाशी), मध्य प्रदेश (सागर), महाराष्ट्र (नागपूर), तेलंगणा (हैदराबाद), आंध्र प्रदेश (अनंतपूर), कर्नाटक (बेंगळुरू), तामिळनाडू (सालेम, मदुराई आणि कन्याकुमारी) असा प्रवास केला. अनेक ठिकाणी आमचे स्वागत व सत्कार झाले,” असे मोनीष चक्रवर्ती यांनी नमूद केले.
सुनील रेडेकर म्हणाले, “संपूर्ण भारतभर सायकलिंगचा अनुभव असलेल्या महाराष्ट्र आणि उत्तराखंडमधील (पुणे आणि डेहराडून) मल्टिस्टेट सदस्यांनी या मोहिमेत उत्तमप्रकारे सहभाग घेतला. ६६ वर्षांच्या सरासरी वयाच्या टीमने हे आव्हानात्मक मिशन पूर्ण करीत ज्येष्ठ नागरिकांसमोर एक उदाहरण ठेवले आहे.”भुवनेश कुलकर्णी म्हणाले, “डेहराडूनच्या सायकलस्वार जोडप्याने मोठ्या जोमाने आणि उत्साहाने काश्मीर ते कन्याकुमारी मोहिम यशस्वीपणे पूर्ण केली. श्रीमती विश्व धीमान या डेहराडूनच्या बायसायकल महापौर देखील आहेत.”
अदनान सिद्दीकी यांनी स्वागत प्रास्ताविक करताना सांगितले की, या चौघा ज्येष्ठांनी आपल्या सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांची ही कामगिरी कौतुकास्पद व प्रेरक अशी आहे. त्यांच्या अनुभव कथनाने आपण सारेच समृद्ध झालो आहोत.———-
–कोट “आम्ही ज्येष्ठ नागरिकांना तंदुरुस्त, आनंदी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी प्रेरित करत राहू इच्छितो. तसेच तरुणांनी उच्चशिक्षित व्हावे आणि भारताला अभिमान वाटेल असे काम करावे याचीही प्रेरणा देण्याचे काम उत्तरोत्तर करत राहू.”- संजय कट्टी, ज्येष्ठ सायकलस्वार