पुणेमहाराष्ट्रराजकीयविशेष

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट तर्फे ७ व्या युवा संसदेचे उद्घाटन

आदर्श खासदार, आमदार, नगरसेवक, सरपंच, युवा पुरस्कारांचे वितरण

पुणे : सध्याच्या राजकारणामध्ये निष्ठा आणि विचारांना अर्थ राहिलेला नाही. गुंडगिरी आणि भ्रष्टाचार वाढीला लागला आहे. यामुळे राजकारणापासून दूर राहणाऱ्या तरुणांनी देशात लोकशाही टिकवण्यासाठी राजकारणात यावे, असे आवाहन करतानाच सुशिक्षित तरुण राजकारणात आला तर देशाला निश्चितच समर्थ नेतृत्व मिळू शकेल असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित ७ व्या युवा संसदेचे उद्घाटन न-हे येथील संस्थेच्या सभागृहात झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर उपस्थित होते. खासदार संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांना आदर्श खासदार पुरस्कार, माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार, सरपंच दिलीप घोलप यांना आदर्श सरपंच पुरस्कार तर उद्योजक सनी निम्हण यांना आदर्श युवक पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. पुणेरी पगडी, शाल, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. या संस्थेच्या ‘उडान’ यावार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

राजू शेट्टी म्हणाले, तरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी आपण राजकारणात कशासाठी येणार आहोत, हे उद्दिष्ट निश्चित करावे. राजकारण म्हणजे केवळ पैसा प्रसिद्धी सत्ता मिळवण्याचे साधन नाही तर ते समाजाची सेवा करण्याची एक संधी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. राजकारण जर सकारात्मकतेने केले तर जनता निश्चितच आपल्या पाठीशी उभे राहते ही मी वैयक्तिक अनुभवातून आपल्याला सांगतो. राजकारणामध्ये अनेक समस्या असल्या तरी या देशाला हुकूमशाहीपेक्षा लोकशाहीच पुढे नेऊ शकते. त्यामुळे या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी तरुणांनी राजकारणात आले पाहिजे.

ओमराजे निंबाळकर म्हणाले, राजकारणामध्ये निष्ठा कायम ठेवली तर यश निश्चितच मिळते. राजकीय सूडापोटी माझ्या वडिलांचा खून झाल्यानंतर मी लोकांच्या प्रेमापोटी राजकारणामध्ये आलो आणि आज तळागाळातील लोकांपर्यंत माझे काम पोचल्यामुळे त्यांना मी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य वाटतो, हे माझ्या राजकारणाचे यश आहे. केवळ लोकांना दाखवण्यासाठी म्हणून काम करू नका. समाजाविषयी तळमळ तुमचा कामातून दिसली तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात.

संजय जाधव म्हणाले, भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि निष्ठाहीन लोकांनी भरलेल्या आजच्या राजकारणामध्ये जर तरुणांना यावेसे वाटले तर त्यांनी कोणाकडे पहावे? असा प्रश्न आहे. परंतु राजकारण वाईट आहे असे समजून त्यापासून दूर राहू नका.तर ते वाईट राजकारण चांगले करण्यासाठी सकारात्मक विचारांचे सुशिक्षित तरुण राजकारणामध्ये आले पाहिजे. जर सुशिक्षित तरुण राजकारणामध्ये आले नाहीत तर या देशावर एक दिवस निश्चितच हुकूमशाही येईल.

साईनाथ बाबर म्हणाले, आजच्या तरुणांनी राजकारणात यावे असे आदर्श त्यांच्यासमोर नाहीत. परंतु राजकारण हे समाजव्यवस्था बदलण्यासाठी चे साधन आहे ते जर आपल्या हातात असेल तर निश्चितच आपण समाजामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो. सुशिक्षित तरुण जर राजकारणात आले तर स्वार्थी राजकारण बाजूला पडून देशाला पुढे नेणारे राजकारण होईल आणि देश निश्चितच त्यातून प्रगती करू शकेल.

सनी निम्हण म्हणाले, राजकारणात येण्यापूर्वी प्रत्येकाने आर्थिक दृष्ट्या सबळ झाले पाहिजे. आपल्या कुटुंबाला जर आपण आर्थिक दृष्ट्या भक्कम करू शकलो तर त्यातून आपण राजकारण करू शकतो. आपण जर आर्थिक दृष्ट्या सक्षम असेल तर निश्चितच आपण राजकारणही समर्थपणे करू शकतो.

दिलीप घोलप म्हणाले, गणेश विद्यालयामध्ये सुधाकरराव जाधवर आणि मी एकत्र शिक्षण घेतले. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी कशाप्रकारे ही संस्था उभी केली आणि यशस्वी केली हे मी निश्चितच जाणतो. समाजाचे मी काहीतरी देणे लागतो या भावनेतील मी सरपंच झालो आणि निस्वार्थ भावनेने सेवा केल्यामुळेच समाज माझ्या पाठीशी आजही उभा आहे.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, राजाच्या पोटी राजा जन्माला येण्यापेक्षा लोकशाहीच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांवरील आणि तांडयांवरील माणूस राजकारणात येऊन सकारात्मक बदल घडावा हा या युवा संसदेमागील उद्देश आहे. साने गुरुजींच्या विचारांमधून देशाची वाटचाल व्हावी आणि युवा संसदेच्या माध्यमातून राजकारणात जाण्यासाठी युवकांना प्रोत्साहन मिळाले तर यातूनच उद्याचा भारत घडविणारे खासदार, आमदार आणि आदर्श सरपंच निर्माण होतील आणि हेच या युवा संसदेचे यश राहील.

प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, राजकारणात यशस्वी होण्यासाठी पैशापेक्षा लोकांविषयी तळमळ असणे गरजेचे आहे, हे आजच्या व्यासपीठावरून आपल्याला दिसते. गरीब कुटुंबांमधूनही नेतृत्व निर्माण होऊ शकते हा संदेश आजच्या युवा संसदेमधून तरुणांनी घ्यावा. त्यामुळे हालाखीची परिस्थिती असली तरीही आपण राजकारणाच्या माध्यमातून सकारात्मक विचार केला तर समाजामध्ये निश्चितच चांगला बदल घडवू शकतो हे तरुणांनी लक्षात ठेवले पाहिजे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!