जुन्नर परिसरातील आदिवासी भागात विद्यार्थ्यांकडून ग्रामस्थांना आवाहन
जुन्नर विधानसभा मतदारसंघातील आदिवासी भागात मतदान विषयक जनजागृती उपक्रम राबवितांना ग्रामस्थांना सेल्फीच्या माध्यमातून मतदान करण्याची शपथ घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले. धावशी या डोंगरावर वसलेल्या दुर्गम भागातील गावातही विद्यार्थ्यांनी उत्साहाने मतदार जागृती उपक्रमात सहभाग घेतला.
मतदान जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांनी अनोखी कल्पना शोधून काढली. त्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सेल्फीसाठी मतदानाचे महत्व असणारा संदेश लिहिलेली चौकट तयार केली. जनजागृती फेरीदरम्यान भेटणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी ही चौकट हातात घेवून छायाचित्र घेण्यास सांगितले आणि मतदान करण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले. गावातील तरुण, वृद्ध, महिला सर्वांनीच या उपक्रमाला प्रतिसाद देत मतदान करणार असल्याचे सांगितले.
स्वीप समन्वयक अनिता शिंदे आणि माध्यम कक्ष समन्वयक संजय जाधव, सहाय्यक समन्वयक बाळासाहेब भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मढ, कोपरे,मुथाळणे, बांगर वाडी, सितेवाडी, धावशी, साबरवाडी, वसईवाडी येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मतदान हा आपला अधिकार असल्याचा संदेश देत आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात स्वीप समन्वयक ,गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक उपस्थित होते.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला मतदानाचा संकल्पखेड आळंदी विधानसभा मतदाररसंघांतर्गत हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील ९०० हून अधिक विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र भरून घेण्यात आले. विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रीयेबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत शपथ घेतली. प्रथमच मतदान करता येणार असल्याने नवमतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सोमवारी देखील हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
बँक व पोस्ट कार्यालयात मतदानाचे आवाहनहडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध बँका व पोस्ट कार्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. मतदान हा आपला अधिकार असून आपण लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजवावा,अ से आवाहन करण्यात आले. बँक कर्मचारी आणि ग्राहकांनी उपक्रमात सहभाग घेतला. स्वीप समन्वयक अमरदीप मगदूम, पर्यवेक्षक तेजस्विनी गदादे, सहाय्यक संजीव परदेशी आदी यावेळी उपस्थित होते.