लामा फेरा फाऊंडेशनच्या वतीने माईंच्या गुणवंत लेकींचा गौरव
आपला वेग वाढवा कारण सध्याचे युग वेगवान आहे; डॉ. सत्येंद्र शुक्ला यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

पुणे: नुकताच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून सर्वत्र गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे. यामध्येच अनाथांची माय सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या ममता बाल सदन मधील दहा मुलींनी देखील उत्तम यश संपादन केले आहे. याचं विद्यार्थ्यांचा डॉ. सत्येंद्र शुक्ला यांच्या लामा फेरा फाऊंडेशन तर्फे दिनांक २३ मे २०२४ बुध्द पौर्णिमेच्या दिवशी मोहम्मदवाडी, पुणे येथील लामा फेरा मॉनेस्ट्री येथे सन्मान करण्यात आला.
यामध्ये ७३.६७% मार्क घेऊन प्रथम येणाऱ्या शीतल साळवे हिला ११ हजाराचा धनादेश, मेडल, आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तर द्वितीय क्रमांक पूजा सावंत (६९%) हिला ५१०० रुपयेचा धनादेश, तृतीय क्रमांक भाग्यश्री राऊत (६३%) हिला २१०० रुपयेचा धनादेश उर्वरित सात विद्यार्थ्यांना प्रत्येकी ११०० रुपये आर्थिक मदत व मेडल देऊन गौरवण्यात आले. यामध्ये सायली शर्मा (५४. १७%), पूनम नांदघुरे (५४%), रितीक्षा पिंपळशेंडे (५२%), स्वप्नाली काळभोर (५०. ३३%), सोनावणे प्राजक्ता (४३. ६७%), भावना जगताप (४२%), संस्कृती भायजे (४१ %) या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या सन्मान सोहळ्याप्रसंगी लामा फेरा हिलर डॉ. सत्येंद्र शुक्ला, पुणे पोलिस गुन्हे विभागाच्या S.P. अनुजा देशमाने, ममता बाल सदन चे दादा गायकवाड, तर बौद्ध पौर्णिमेनिमित्त आलेले अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उज्ज्वल भविष्यासाठी १२वी नंतर कसे पाऊल टाकायचे, आजचे कठोर परिश्रम उद्या सुगीचे दिवस आणणारे असतील. सध्याचे युग वेगवान आहे; त्यांच्या सोबत नाही गेलात तर मागे राहाल! असे मत डॉ. शुक्ला यांनी व्यक्त केले. प्रसंगी गुन्हे विभागाच्या पोलीस अधिकारी अनुजा देशमाने यांनी देखील मार्गदर्शन केले.

बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित तथागत गौतम बुद्ध यांचे पूजन, स्तुती, प्रार्थना व महाबोधी ध्यान आणि महाप्रसाद यामध्ये देखील सर्व सहभागी झाले होते.