पुणेमहाराष्ट्रविशेषव्यवसायीकशैक्षणिक

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी टेक्नॉलॉजी लॅबचे उद्घाटन

दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलमध्ये बॉश कंपनीद्वारे लॅब

पुणे, ता. १८: तंत्रज्ञान आणि सेवांमध्ये जागतिक स्तरावर अग्रणी असलेल्या बॉश कंपनीच्या सहकार्याने दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी लॅबचे उदघाटन नुकतेच झाले. या टेक्नॉलॉजी लॅबचा लाभ विशेषतः प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांना होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ‘बॉश’ पुणेचे संचालक आदित्य अडावी, अतिरिक्त आयकर आयुक्त राजेश गवळी, ‘दीपस्तंभ’चे यजुर्वेंद्र महाजन, बॉस कंपनीच्या सीएसआर विभाग प्रमुख आकांक्षा तिवारी, मनोबलच्या सीमा सावंत, अमोल लंके, दिनेश पाटील, योगेश शार्दुल आदी उपस्थित होते.

टेक्नॉलॉजी लॅबच्या माध्यमातून प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात आणि त्यापुढील प्रगतीसाठी आवश्यक असलेली संसाधने उपलब्ध होणार आहेत. या टेक्नॉलॉजी लॅबमध्ये विषयाच्या संकल्पना समजण्यासाठीची वेगवेगळी उपकरणे, संगणक तंत्रज्ञानावर आधारित जगभरात विकसित केलेली उपकरणे, दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी वेगवेगळी साधने, स्मार्ट गॉगल्स, मॅग्निफायर्स, विविध सॉफ्टवेअर, कीबो डिव्हाईस इत्यादी उपकरणांचा समावेश आहे. या आधारे दिव्यांग विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उच्च शिक्षण व तंत्रज्ञानाचे शिक्षण व प्रशिक्षण दीपस्तंभ मनोबलमध्ये घेतात.

“दीपस्तंभ मनोबलमध्ये दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी उच्च, प्रगत टेक्नॉलॉजी लॅब साकार झाल्याचा विशेष आनंद होत आहे. या उपकरणांच्या मदतीने प्रज्ञाचक्षू विद्यार्थी त्यांचा अभ्यास अधिक प्रभावीपणे करू शकतील. गणित, विज्ञान, भूगोल यांसारख्या विषयांतील त्यांच्या संकल्पना अधिक विस्तृतपणे समजण्यास त्यांना मदत होणार आहे,” अशी भावना आदित्य अडावी यांनी व्यक्त केली.

राजेश गवळी म्हणाले, “देशभरातील अपंग, अनाथ विद्यार्थ्यांचे परिस्थितीवर मात करून उत्तुंग भरारी घेण्याचे मनोबलमध्ये होत असलेले प्रयत्न बघून भारावलो आहे. तंत्रज्ञान प्रशिक्षण व मुख्य प्रवाहातील करिअरच्या संधीमुळे हे विद्यार्थी सर्वांच्या सोबत खांद्याला खांदा लावून विकसित होतील व देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावतील, याबाबतीत मला विश्वास वाटतो.”

“बॉशचे सहकार्य सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरणार आहे. जिथे सर्व दिव्यांग व्यक्तींना उत्कर्षाच्या समान संधी मिळणार आहे. बॉशच्या या सहकार्याबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो,” असे यजुर्वेंद्र महाजन यांनी नमूद केले. दिव्यांग विद्यार्थी ऋषिकेश पवार याने आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!