आर्थिकदेश-विदेशपुणेमहाराष्ट्रविशेषव्यवसायीक

‘आयसीएआय’तर्फे शेअर मार्केटवरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

शेअर बाजारासाठी संयम व जोखीम पत्करण्याची मानसिकता हवी- सीए चरणज्योत सिंग नंदा

पुणे: “शेअर बाजारात चढ-उतार होत राहतो. बाजार अचानक उसळी घेतो, तर अचानक कोसळतो. हा व्यवसाय अनिश्चित स्वरूपाचा आहे. त्यामुळे शेअर बाजारात व्यवसाय किंवा गुंतवणूक करताना संयम, सामंजस्य व जोखीम पत्करण्याची मानसिकता हवी,” असे प्रतिपादन दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे (आयसीएआय) केंद्रीय उपाध्यक्ष सीए चरणज्योत सिंग नंदा यांनी केले.’

आयसीएआय’च्या कमिटी ऑफ फायनान्शियल मार्केट्स अँड इनवेस्टर्स प्रोटेक्शन (सीएफएमआयपी) आणि आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने आयोजित शेअर मार्केटवरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सीए नंदा यांच्या हस्ते झाले. म्हात्रे पुलाजवळील सिद्धी बँक्वेट येथे झालेल्या कार्यक्रमावेळी ‘सीएफएमआयपी’चे चेअरमन सीए दुर्गेश काबरा, केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए (डॉ.) राजकुमार अडुकिया, विभागीय समिती सदस्य सीए यशवंत कासार व सीए ऋता चितळे, पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, उपाध्यक्ष सीए सचिन मिनीयार, परिषदेचे समन्वयक सीए जितेंद्र खंडोल, सहसमन्वयक सीए सर्वेश जोशी, आयसीएआय पुणेचे सचिव सीए ऋषिकेश बडवे, कार्यकारिणी सदस्य सीए अजिंक्य रणदिवे, सीए प्रणव आपटे, सीए प्रितेश मुनोत आणि सीए राजेश अग्रवाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या परिषदेत ४०० पेक्षा अधिक सनदी लेखापाल, गुंतवणूकदार, व्यावसायिक, आर्थिक सल्लागार व इतर इच्छूकांनी सहभाग नोंदवला. सीए चरणज्योत सिंग नंदा म्हणाले, “शेअर बाजारात येताना केवळ पैसे कमवण्याचा दृष्टिकोन असू नये. तसेच भावनांवर संयम असावा. नुकसान झाले, तर खचू नये आणि लाभ झाला, तर हुरळून जाऊ नये. शेअर बाजाराची रचना समजून घेऊन वास्तवात जगावे. शिस्त पाळण्यासह शेअर बाजारातील आपला उद्देश नेमका काय, हे निश्चित करावे.”

सीए दुर्गेश काबरा म्हणाले, “आज देशभरात १ लाख ६० हजार प्रॅक्टीस करणारे सीए आहेत. शेअर बाजारात सीएसाठी विविध संधी आहेत. शेअर मार्केटचा अभ्यास करावा. यात येण्यासाठी ठराविक वेळ नाही. लाभाची अपेक्षा असते, तशी नुकसान सहन करण्याची क्षमता आपल्याकडे असायला हवी.”

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सामान्य माणूसही शेअर बाजारात पाऊल ठेवत आहे. आर्थिक बाबतीत भारत प्रगतीपथावर असल्याने भारतासह विदेशातील गुंतवणूदारही शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी पुढे येत आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूक, प्रक्रिया यासाठी सनदी लेखापालांची मार्गदर्शक म्हणून भूमिका महत्वाची आहे.”

सीए (डॉ.) राजकुमार अडुकिया, सीए ऋता चितळे, सीए यशवंत कासार यांनीही आपले विचार मांडले. सीए व्यावसायिक, विद्यार्थी, आर्थिक क्षेत्राशी संबंधित घटकांना मार्गदर्शक अशा उपक्रमांचे संस्थेतर्फे आयोजन करण्यात येत असल्याचे सीए अमृता कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सांगितले. सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले. सीए सचिन मिनीयार यांनी आभार मानले.

दोन दिवसीय परिषदेत विचारमंथन*शेअर मार्केटवरील या दोन दिवसांच्या परिषदेत सीए चरणज्योत सिंग नंदा यांच्या बीजभाषणानंतर सीए जितेंद्र खंडोल यांनी ‘वेल्थ क्रिएशन थ्रू ट्रेडिंग इज एन आर्ट’, मितेश ठक्कर यांनी ‘ब्रेकआऊट गॅप्स’, देवेन चोक्सी यांनी ‘वेल्थ क्रिएशन थ्रू लॉंगटर्म इन्व्हेस्टमेंट’, जीवन पटवा यांनी ‘स्पॉटिंग मल्टिबॅगर्स अँड रायडींग ऑन इट’, सीए अनुराग गोयल यांनी ‘आयपीओ फंड रेजिंग’ यावर मार्गदर्शन केले.

सीए विक्रम कोटक व सीए अनिल सिंगवी यांचा ‘इन्व्हेस्टमेंट की पाठशाला : सीए इज इन्व्हेस्टमेंट गुरु’ यावर विशेष कार्यक्रम झाला. सीए सिद्धार्थ व्होरा, सीए आशिष बाहेती यांचीही माहितीपर सत्रे झाली. ‘प्रादेशिक राजकारण, निवडणूक आणि त्याचा इक्विटी मार्केटवर होणार परिणाम’ यावर चर्चासत्र झाले. यामध्ये नितीन धर्मावत, जयदीप मराठे, सीए प्रकाश खंडेलवाल, सीए मोशमी शहा यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!