शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे ‘शाहिरी निनाद’ अंकाचे प्रकाशन व सन्मान सोहळा
शाहिरी ही मनाचे व समाजाचे जडणघडण करणारी कला- खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी
पुणे : शाहिरी कला ही शौर्याचे वर्णन करण्यापुरती मर्यादित नाही. देशासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींमधील प्रेरणा सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. शाहिरी हा एका संस्कार आहे. त्यामुळे शाहिरी ही मनाचे व समाजाचे जडणघडण करणारी कला असल्याचे मत राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे कै. शाहीररत्न किसनराव हिंगे यांच्या २६ व्या स्मृतीदिन समारोहानिमित्त ‘शाहिरी निनाद’ अंकाचे प्रकाशन व पोवाडा प्रशिक्षण वर्ग समारोप कार्यक्रम मालधक्का चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे पार पडला. यावेळी संस्कार भारती पश्चिम क्षेत्र प्रमुख चंदू घरोटे, अनुबंध प्रकाशनाचे अनिल कुलकर्णी, आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमात शाहीर हिंगे यांचे सहकारी ज्येष्ठ ढोलकीवादक केदार मोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील शाहीर निलेश जाधव व सहकारी यांचा शाहिरी कार्यक्रम झाला. प्रबोधिनीचे अरुणकुमार बाभुळगावकर, होनराज मावळे, अक्षदा इनामदार आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.
चंदू घरोटे म्हणाले, शाहिरीचा प्रचार, प्रसार करण्याचे काम शाहीर हेमंतराजे मावळे व त्यांच्या कुटुंबियांकडून होत आहे. असा कलेचा वसा घेऊन कार्य करणारी ध्येयवेडी माणसे गावागावात उभी राहायला हवी, असेही त्यांनी सांगितले. अनिल कुलकर्णी म्हणाले, शाहिरी परंपरा जुन्या जाणत्या शाहीरांकडून आपण शिकायला हवी. महाराष्ट्र मुक्तीची चळवळ शाहीरांनी गाजविली, हा इतिहास आपण विसरता कामा नये.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, शाहिरी ही मृतावस्थेकडे जाणारी कला आहे, असे आज म्हटले जाते. पण ही कला मृता नव्हे , तर अमृतावस्थेकडे जात आहे. आम्ही प्रबोधिनीच्या माध्यमातून शाहिरी तळागाळात जावी, याकरिता कार्य करीत आहोत. समाजाने या कलेकडे डोळसपणे पाहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. अक्षता इनामदार हिने सूत्रसंचालन केले. होनराज मावळे यांनी आभार मानले.