संपदा सहकारी बँकेचा सुवर्णमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ शनिवारी (दि.१०)
'सुवर्णसंपदा' स्मरणिकेचे प्रकाशन व संपदा समाजकल्याण पुरस्कार वितरण
पुणे : संपदा सहकारी बँक लि. पुणे च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा शनिवार, दिनांक १० आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुक्तांगण सभागृह, पुणे विद्यार्थी गृह, तावरे कॉलनी, शिवदर्शन येथे आयोजित करण्यात आला आहे. रिझर्व बँक आॅफ इंडियाचे संचालक सतिश मराठे व ज्येष्ठ अर्थ तज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अश्विनीकुमार उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला बँकेचे उपाध्यक्ष महेश लेले, मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश सरदेशपांडे, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष मुकुंद भालेराव आदी उपस्थित होते.
गिरीश सरदेशपांडे म्हणाले, कार्यक्रमात महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना यांना संपदा समाज कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रुपये ५१,०००/- आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दिनांक २ आॅगस्ट १९७४ रोजी स्थापन झालेल्या बँकेचे २०२३-२४ हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने आयोजित सांगता समारंभाच्या अध्यक्षस्थानी इस्कॉनचे श्रद्ध्ेय अनंत गोप प्रभु हे उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात बँकेच्या सुवर्णसंपदा या स्मरणिकेचे प्रकाशनही होणार आहे. कसबा गणपती चौकात बँकेचे मुख्य कार्यालय असून सध्या ८ शाखा कार्यरत आहेत. महेश लेले म्हणाले, सुवर्णमहोत्सवात बँकेने अर्थसाक्षरता हा एक अभिनव उपक्रम हाती घेतला. वर्षभरात अभियानाचे ६० पेक्षा अधिक कार्यक्रम झाले. यामाध्यमातून ३ हजार पेक्षा जास्त नागरिकांशी याविषयी संवाद साधण्यात आला. त्यांना बॅकिंग व्यवहाराबद्दल विविध नियमांची माहिती, खात्यांचे विविध प्रकार, डिजिटल व्यवहारांमधील धोके, घ्यावयाची काळजी इ. माहिती देण्यात आली. सर्व शाखांनी ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
मुकुंद भालेराव म्हणाले, बँकेच्या ८ शाखा असून दि. ३१ मार्च २०२४ अखेर बँकेच्या रुपये १८७.७७ कोटींच्या ठेवी असून रुपये १२३.२२ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. बँकेचे निव्वळ एनपीए चे प्रमाण ०.००% असून बँकेस यावर्षी रुपये १.५१ कोटी नफा झाला आहे. नुकतीच बँकेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सन २०२३-२४ या वैधानिक लेखापरिक्षकांनी बँकेस अ आॅडिट वर्ग दिला आहे. सभासदांना सन २०२२-२३ साठी ८ टक्के आणि सन २०२३-२४ साठी १० टक्के लाभांश देखील दिला आहे. तसेच बँकेने ग्राहकांसाठी डेबिट कार्ड, मोबाईल बँकिंग, युपीआय आदी सुविधा दिल्या आहेत.
धायरी व कात्रज येथे बँकेची दोन एटीएम मशीन असून डेटा सुरक्षिततेसाठी बँकेने क्लाऊड कम्प्युटिंग तंत्रज्ञान अवलंबिले आहे. सुवर्णमहोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली दि. ६ आॅगस्ट २०२३ रोजी टिळक स्मारक मंदिर येथे संपन्न झाला होता.
या सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून रा.स्व.संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघचालक सुरेश तथा नाना जाधव आणि अंब्रेला आॅर्गनायझेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवाडकर उपस्थित होते. सांगता सोहळा शनिवार, दिनांक १० आॅगस्ट २०२४ रोजी सायं. ५.३० वाजता असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.