पुणे : समाजात अनेक प्रकारचे उत्सव होत असतात. परंतु हे उत्सव समाजाचे व्हायला हवेत. आपल्याला अनेक गोष्टी सहज मिळतात, त्यामुळे संघर्षाची जाणीव नसते. ही जाणीव समाजातील अनेक घटकांना असून त्यांना मदतीचा हात देण्याकरिता सामाजिक उपक्रमांचा उत्सव ठिकठिकाणी साजरा व्हायला हवा, असे मत महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी व्यक्त केले.
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट च्या वतीने मंडईतील बुरुड आळीत आयोजित म्हसोबा उत्सवात पोतराज समाजासाठी कार्यरत सह्याद्री मेडिकल एज्युकेशन फाऊंडेशनला ५१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. यावेळी पेशवाई क्रिएशन्सचे राहुल येमुल, सौरभ अमराळे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
फाऊंडेशनचे संस्थापक डॉ.धर्मराज साठे यांनी ही मदत स्विकारली. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. शेखर मुंदडा म्हणाले, पोतराज समाजाकरिता डॉ. धर्मराज साठे यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या वडिलांना त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त केल्याने ते आज एवढे मोठे कार्य उभे करु शकले. त्यांचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा. शिक्षणाचे किती महत्व आहे, हे आपल्याला यावरुन समजेल, असेही त्यांनी सांगितले.
निवृत्ती जाधव म्हणाले, धार्मिकतेसोबत सामाजिकता जपताना दरवर्षी विविध संस्थांना मदत दिली जाते. पुढील वर्षीपासून उत्सवात भाकड गाईंना सांभाळणा-या गोशांचा देखील सन्मान केला जाईल, असे आश्वासन त्यांनी शेखर मुंदडा यांना दिले.
कार्यक्रमानंतर सर्व मुलांकरिता स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते. अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.