आदिवासी महिलांनी अनुभवला प्रेरणाचा श्रावण सोहळा
प्रेरणाचा श्रावण सोहळा व पुरस्कार वितरण समारोह मोठ्या दिमाखात संपन्न
पुणे, (प्रतिनिधी): गुरूकुल एज्युकेशन फाउंडेशन’ आणि “प्रेरणा the motivation” आयोजित श्रावण सोहळा आणि प्रेरणा पुरस्कार २०२४ बुधवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पद्मावती, पुणे येथे मोठ्या दिमाखात पार पडला. सोहळ्याचे यंदा तिसरे वर्ष असून निखळ आनंद देणारा हा प्रेरणाचा श्रावण सोहळा सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश शुल्कावर असल्याने कार्यक्रमाला महिलांनी चांगलाच प्रतिसाद दर्शवला. प्रेरणा the motivation”च्या संचालिका व कार्यक्रमाच्या मुख्य आयोजिका सौ. शारदा दातीर पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून, तर आदिवासी महिलांसह मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवात केली.
यंदाच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या आदिवासी कातकरी महिलांनी सादर केलेले कलाविष्कार पाहून प्रेक्षक भारावून गेले. एरवी घर चालविण्यासाठी दिवसभर कामात व्यस्त असणाऱ्या या महिला आज मात्र नटून-थटून पुणेकरांचे मनोरंजन करत होत्या. पारंपरिक गाण्यांसह ‘राजा मला नऊवारी साडी पाहिजे’ या सारख्या ट्रेंडिंग गाण्यांवर देखील या आदिवासी महिलांनी ताल धरला. या महिलांचा उत्साह वाढविण्यासाठी पुण्यातील अनेक संस्थांनी पुढे येत त्यांना सहकार्य करत अनेक उपहार देखील दिले.
सदर श्रावण सोहळ्याचा अजून एक आकर्षक ठरलेला भाग म्हणजे स्वतःला प्रेरित करण्यासाठी घेण्यात आलेला “आय ॲम प्रेरणा फॅशन वाक”. या वर्षीचा फॅशन वॉक हा रजवाडी थीम वर आसल्याने सर्वांनाच मोहित व सुखद अनुभव देणारा ठरला. यामध्ये सर्व वयोगटातील महिलांनी उत्तम रजवाडी पहेराव परीधान करून सहभाग घेतला होता. स्वतःला प्रेरित करण्याच्या दृष्टीने घेतलेला हा फॅशन वॉक अनेकांना प्रेरणा देणारा ठरला. वॉक मध्ये सहभागी झालेल्या महिलांसाठी पुणे बिजनेस क्लबच्या संचालिका सपना काकडे यांच्यातर्फे लकी ड्रॉ विजेत्याला सोन्याची नथ देण्यात आली.
प्रेरणादायी व्यक्तींचा पुरस्कारा मध्ये यंदा देण्यात आलेला प्रेरणा पुरस्कार २०२४ अंबिका मसालेच्या कमलताई परदेशी यांना मरणोत्तर दिला, या पुरस्काराचा स्वीकार त्यांची मुलगी सौ. निलनी गायकवाड यांनी केला. दुसरा पुरस्कार प्रसिद्ध युटुबर, प्रेरणादायी वक्ते आकाश पवार यांना त्यांच्या खडतर जीवन प्रवासाला प्रदान करण्यात आला. पुणे बिजनेस क्लबच्या व सयोग ह्वेंचर’ च्या संचालिका सौ. सपना काकडे यांना उद्यमी क्षेत्रातला प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले,सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या चित्रा मेटे यांना देखील प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले महीला संबळ वादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौ. गौरी वनारसे यांना कलाक्षेत्रातील प्रेरणा पुरस्कार दिला गेला, पोलिस पाटीलकीच्या उल्लेखनीय कार्याबद्दल तृप्ती मांडेकर यांना सन्मानित केले. वय वर्षे चार च्या आत अनेक बुक रेकॉर्ड मध्ये नाव अधोरेखित केलेली कुमारी दुर्वा वाघ हिला देखील यंदाचा पुरस्कार दिला. राजश्री क्षीरसागर आणि अभिषेक पवार यांना ब्युटी क्षेत्रात अनोखी कामगिरी केल्या बद्दल पुरस्कृत करण्यात आले. समर्थ विद्यालयाच्या संचालिका आणि शारदा दातीर यांच्या प्रेरणा स्थान मा. गीता दुवेदी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, गिफ्ट हम्पर असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
महिलांच्या आवडीचे मंगळागौरीचे खेळ, महाराष्ट्राची लावणी, समूह नृत्य, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेते दिवंगत दादा कोंडके यांना समर्पित खास सादरीकरणाने प्रेक्षकांचे मने जिंकली. उपस्थितांसाठी भरघोस लकी ड्रॉ काढण्यात आले; या मध्ये ॲपल हॉलिडेज तर्फे मोफत गोवा ट्रिप, अश्विनी जाधव यांच्या वतीने मानाची पैठणी, डहाळे ज्वेलर्स तर्फे सोन्याची नथ, आणि बरेच काही जिंकण्याची संधी मिळाली. येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला स्नॅक्स बॉक्स आणि मिनरल वॉटरची देखील व्यवस्था आयोजकांनी करून दिली होती.