पुण्याचे गणेशोत्सवात गणेश भक्तांनी जाणले जागतिक वारसा स्थळांचे महत्त्व
गणेशोत्सवाची धामधुम संपत असतानाच यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत
पुणे: जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ले जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित करण्यात आले असून या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या पुढाकाराने पुणे शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीत आकर्षक जागतिक वारसा रथाद्वारे अलका सिनेमागृह चौकात जनजागृती करण्यात आली. यावेळी पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, जिल्हा नियोजन समितीचे किरण इंदलकर, उप जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश काळे, गणेश दानी, डेक्कन कॉलेज, पदव्युत्तर व संशोधन संस्थेचे (अभिमत विद्यापीठ) प्राध्यापक निलेश जाधव, मे. शिवाई कृष्णा प्रा. लि.चे उदय शिंदे, आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, शिवदुर्गसवर्धन संस्थेचे पंडित अतिवाडकर, सह्याद्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले ‘मराठा लष्करी भूप्रदेश’अंतर्गत जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित केले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड, राजगड या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. नामांकनादरम्यान किल्ल्यांच्या प्रचार-प्रसारासाठी जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणयुकीदरम्यान शहरातील अलका सिनेमागृह चौकात आकर्षक एलईडी स्क्रीनवर गडकिल्ल्यांची माहिती देणारे छायाचित्रण दाखविण्यात आले. यामध्ये गडकिल्ल्यांची माहिती, नकाशे, छायाचित्रे आदींचा समावेश करण्यात आला.
जागतिक वारसा रथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. जागतिक वारसा नामांकनाच्या प्रचार-प्रसार मोहिमेत डेक्कन कॉलेज, पदव्युत्तर व संशोधन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांना जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित १२ गडकिल्ल्यांच्या माहिती दिली. नामांकनाच्या प्रसारासाठी १० हजार हस्तपत्रिकांचे वाटप करण्यात आले.
‘जागतिक वारसा नामांकनाचे आम्ही साक्षीदार’ या स्वाक्षरी मोहिमेत नागरिकांनी सहभाग घेत स्वाक्षरी केल्या. या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे डॉ. वाहणे यांनी कळविले आहे.